स्वच्छता कर्मचार्‍यांचा सन्मान, रक्तदान शिबिर


न्हावी येथे सदगुरू स्मृती महोत्सव : देश-विदेशातील हरीभक्तांसह संत-महंतांची उपस्थिती

फैजपूर : जवळच असलेल्या सदगुरू स्मृती महोत्सवाच्या पाचव्या दिशी शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 101 संत व भक्तांनी रक्तदान केले तर हे रक्त केवळ गोरगरीबांसाठी सामान्य रुग्णालयात वापरले जाणार आहे. प्रसंगी न्हावी गावातील ब्राह्मणांचा तसेच गावातील साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांचा व्यासपीठावर संत व महाराजश्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महोत्सवासाठी देश-विदेशातील हरीभक्तांसह संत-महंतांची उपस्थिती लाभत आहे. प्रथम सत्रात वक्ताश्री सदुगुरु शास्त्री भक्तिप्रकाशदासजी यांनी श्रीममद भागवत अंतर्गत कृष्णाच्या बाळ लीलांच मधुर शैलीत निरूपण केलं. संपूर्ण महोत्सव गुरुवर्य सद्गुरु शास्त्री श्री नीलकंठदासजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साजरा केला जात आहे.

नूतन छत्रीचे बांधकाम
गुरुवर्यांची भक्ती पाहूनन सद्गुरु स्मृती महोत्सवानिमित्त मंत्रपोथी छापून वाटण्यात आली. या भक्तिकार्यात खानदेशातील सर्व भक्तांनी उत्साहपूर्ण भाग घेतला व स्वामीनारायण महामंत्र लिहून पाच करोड 25 लाख मंत्र लेखन झालं. शास्त्री धर्मप्रसाददासजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजी या दोघांच्या संकल्पनेतून एक नवीन विचार साकारला गेला. या सर्व मंत्रलेखन झालेल्या मंत्रपोथ्या भगवान श्री स्वामिनारायण यांच्या चरणांनी प्रसादीभूत झालेल्या चरणारविंद छत्रीखाली ठेवण्यात आल्या. नूतन छत्रीचे बांधकाम श्री स्वामीनारायण मंदिर, न्हावी येथे करण्यात आले. आरसच्या नक्षीयुक्त पत्थरातून छत्री निर्माण झाली. राजस्थानातील कारागीरांनी नक्षी करून इथं दगड आणला व नयनरम्य छत्री निर्माण झाली. या छत्रीखाली मंत्र पोथ्या ठेवण्यात आल्याने मंत्रांचा तेज चरणारविंदमध्ये येईल व दर्शन करणार्‍या सर्व भक्तांचे मनोरथ, संकल्प पूर्ती होईल. असे हे सुंदर कार्य धर्ममार्तंड वडताल पीठाधीपति परमपूज्य धर्म धुरंधर 1008 आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.

गुजराती वचनामृत ग्रंथाचा मराठी भाषेमध्ये अनुवाद
भगवान श्री स्वामिनारायण यांची परावाणी म्हणजेच वचनामृत ग्रंथ. हा ग्रंथ आतापर्यंत गुजराती भाषेत होता. स्वामीनारायण संप्रदायाचा महाराष्ट्रात सुद्धा व्याप असल्याने भक्तांना प्रतीक्षा होती हा ग्रंथ आम्हाला मराठी भाषेत प्राप्त व्हावा. भक्तांची ही संकल्पना लवकरच पूर्ण झाली. महाराजश्री यांच्या आज्ञेने, सद्गुरु शास्त्री धर्मप्रसादजी व शास्त्री भक्तिप्रकाशदासजींच्या आशीर्वादाने सद्गुरू शास्त्री भक्तिकिशोरदासजींनी गुजराती वचनामृत ग्रंथाचं मराठी भाषेमध्ये अनुवाद केला. सोबत श्राव्य म्हणून वचनामृत रेकॉर्डिंग करून पेन ड्राईव्ह स्वरूपात आचार्यश्री व संतांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. दुपार सत्रात सजीव देखावे सादर करण्यात आले. रात्री श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था, सावदा येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी परमपूज्य धर्म धुरंधर 1008 आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज, पूज्य मातोश्री, महोत्सवाचे अध्यक्ष शास्त्री धर्म प्रसाददासजी, उपाध्यक्ष शास्त्री ज्ञानप्रकाशदासजी (गांधीनगर), के.पी.स्वामी (भावनगर), माधव स्वामी (नाशिक), बालमुकुंद स्वामी, हरीवल्लभ स्वामी, जे.पी. स्वामी (वडोदरा), विष्णू स्वामी (भावनगर), निर्लेप शास्त्री (बोरसद), सार्थक नेहेते (क्राइम ब्रांच नागपुर), हरिभाऊ जावळे (माजी आमदार) इत्यादी महानुभाव उपस्थित होते.


कॉपी करू नका.