भुसावळातील जीम ट्रेनरवर प्राणघातक हल्ला : 18 संशयीतांविरोधात गुन्हा
Assault on gym trainer in Bhusawal : Crime against 18 suspects भुसावळ : दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून खुन्नस ठेवून शहरातील जीम ट्रेनरवर ठार करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री 8.50 वाजेच्या खडका रोडवरील अलिया कोल्डींक्सच्या दुकानात घडली. या प्रकरणी अठरा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अफाफ अख्तर पटेल (30, डॉ.झोपे यांच्या दवाखान्याजवळ, भुसावळ) असे जखमीचे नाव आहे.
जुन्या वादातून केला प्राणघातक हल्ला
अफाफ पटेल हा जीम ट्रेनर कॅरम खेळत असल्याची माहिती बिलाल बागवान व शेख हमजा शेख रफीक या दोघांनी इतर हल्लेखोरांना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी व रात्री दिली होती. त्या माहितीच्या आधारे रात्री 8.50 वाजेच्या सुमारास रोमान शेख शकील, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख फिरोज आणि लतीफ तडवी यांनी अफाफ पटेल यास गाठून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत रॉड आणि लाठ्यांनी मारहाण केली. यात अफाफ पटेल हा जीम ट्रेनर जबर जखमी झाला तसेच संशयीत दानिश शेख फरीद, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मील शेख फरीद, तोहीद शेख नासीर शेख, अबुजर शेख बशीर, मुस्तफा शाह युनुस शाह, नासिर सन्नाटा आदींनी दरवाजावर उभे राहून मारहाण करणार्यांना मदत केली. यात इम्मू कोलरीया, कल्लू तडवी आणि अक्रम शेख सबदर शेख या तिघांनी मोटारसायकलवर बसून उपस्थित हल्लेखोरांना मदत केली. कलीम उंद्री व शरीफ उंद्री या दोघांनी अफाफ पटेल यास जीवे ठार मारण्याचा कट रचून जबर मारहाण केली. यात अफाफ पटेल याचे दोन्ही हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी वरील सर्व 18 आरोपींविरोधात बाजारपेठ पोलिसात अफाफ अख्तर पटेल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.








