काँग्रेसमध्ये खळबळ : बाळासाहेब थोरांतांनी दिला राजीनामा
Congress leader Balasaheb Thorat resigned मुंबई : वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी मोठा निर्णय जाहीर केला असून त्यांनी विधीमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधी मंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परीषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झाले, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. या संदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही पाठवल्याची माहिती काल थोरात यांनी दिली होती. मंगळवारी अखेर त्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.

सत्यजीत तांबेंनी केली होती टिका
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. तर सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती.