भुसावळात पोस्टातील कर्मचार्यांना उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

भुसावळ : भारतीय पोस्ट विभागांतर्गत येणार्या सर्व कार्यालयांमधील कर्मचार्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी भुसावळ पोस्ट विभागाचे अधीक्षक पी.बी.सेलूकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील, साहित्यिक अ.फ.भालेराव, सहाय्यक अधीक्षक एस.एस.म्हस्के, निरीक्षक पी.एस.मालकर, तक्रार निरीक्षक निशांत शर्मा, शाखा प्रबंधक मनिष तायडे, विभागीय प्रबंधक गोपाल पाटील, एफ. आर. तडवी, आरिफ तडवी, अमोल नेहेते, अविनाश चौधरी यांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त कर्मचार्यांचाही गौरव
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक पी.बी.सेलूकर यांनी केले. राकेश पाटील यांनी मोबाईलबद्दल माहिती दिली. डॉ.जगदीश पाटील यांनी ताणतणाव मुक्ती आणि आनंद व ऊर्जादायी सकारात्मक जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले. भालेराव यांनी विविध कवितांचे सादरीकरण करून त्याद्वारे संवाद साधला. शेवटी माय कविता सादर केली. अध्यक्षीय मनोगतात सेलूकर यांनी कर्मचार्यांचे कौतुक करून मनापासून काम करण्याचे आवाहन केले. त्यानंतर एस.बी.विभाग, सुकन्या समृद्धी विभाग, जनसुरक्षा योजना, ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, माय डिजिटल पोस्ट ऑफिस कंपनी, आधार कॅम्पियन वर्क यात उत्कृष्ट काम केलेल्या प्रत्येक विभागातील तिघांना पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचारी आधार सोनार, रघुनाथ महाजन, मंगल कुलकर्णी, चंद्रकांत महाजन, हरिदास हिंगणकर, रमेश पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच भुसावळ विभागातील दीनदयाल स्कॉलरशिप योजनेतील भाविका वाणी, भाग्यश्री महाजन व भुवनेश्वर नेवे या विद्यार्थ्यांना देखील गौरवण्यात आले. सूत्रसंचालन हारून शेख तर आभार पोस्ट मास्तर एजाज शेख यांनी मानले.


