भडगावातील तरुणाला रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने 17 लाखांचा गंडा
17 lakhs extorted from Bhadgaon youth on the pretext of railway job भडगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भडगावातील तरुणाची 17 लाखात फसवणूक करण्यात आली. संशयीतांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी भडगाव पोलिसात पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच संशयीतांविरोधात गुन्हा
तक्रारदार रंगनाथ साहेबराव पाटील (बाळद रोड, भडगाव) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींनी त्यांचा मुलगा अक्षय पाटील यास रेल्वेत नोकरी लावून देवू, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला व वडजी, ता.भडगाव व नाशिक येथे 15 लाखांची रोकड 9 मे 2022 पूर्वी स्वीकारली होती तसेच नोकरीसाठी नोटरीदेखील करून दिली मात्र तक्रारदारास बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यावर खोटी अधिकार्यांची स्वाक्षरी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली मात्र पैसे परत करण्यात न आल्याने त्यांनी भडगाव पोलिसात तक्रार नोंदवली. नोकरीसाठी दिलेले 15 लाख व झालेला अन्य दोन लाखांचा खर्च अशी एकूण 17 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.






यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
फसवणूकीचा कट रचून खोटे दस्तावेज तयार करीत फसवणूक केल्याप्रकरणी संशयीत धनराज किसनराव हाके (40, कमालवाडी, जिल्हा लातूर), मुन्ना सोनिया कुवर (46, रा.वार, ता.साक्री), सुनील बंडू मानकर (48) व प्रतिभा बंडू मानकर (दोघे रा.नाशिक) व कदम (मुंबई) यांच्या विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.


