भोसरी भूखंड प्रकरणात आमदार खडसेंना मोठा दिलासा : अटक करता येणार नाही


मुंबई : भोसरी भूखंड प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या माजी मंत्री खडसेंना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणी चौकशी करा मात्र या प्रकरणात आता चार्ज शीट किंवा अटक करता येणार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण झालेली असताना एकाच विषयाची इतक्या वेळेस चौकशी करून देखील काहीही सापडत नसल्याने भोसरी भूखंड प्रकरणी असलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी खडसे यांनी न्यायालयाकडे केल्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गैरव्यवहाराचा झाला होता आरोप
2016 मध्ये एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना उकानी नामक व्यक्तीकडून खरेदी केला होता. पुण्याच्या उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

पदाचा गैरवापर झालाच नाही
एप्रिल 2017 मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला व र एप्रिल 2018च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागाने पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला, ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट देण्यात आली. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचे नुकसानही झाले नाही, असे लाचलुचपत विभागाने त्या अहवालात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, खडसेंना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याचे वृत्त माहिती न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !