गोजोर्यातील व्यावसायीकाचा महादेवमाळ घाटात अपघाती मृत्यू
Accidental death of businessman from Gojora in Mahadevmal Ghat भुसावळ : तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी व जामनेर येथील साडी विक्री करणार्या व्यावसायीकाचा महादेवमाळ घाटात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री उशिराच्या सुमारास घडला. अपघातानंतर अज्ञात वाहनधारक पसार झाला. पांडुरंग वना पाटील (51, रा.गोजोरा, ता.भुसावळ) असे मयताचे नाव असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रात्रीच्या सुमारास घडला अपघात
पांडुरंग पाटील यांचे जामनेर येथे साडीचे दुकान असून दररोज सकाळी ते दुचाकीने जामनेर येथे जातात व रात्री घरी परततात. गुरुवारी रात्रीदेखील सव्वाआठ वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला फोन करून घराकडे निघाल्याची माहिती दिली मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी पोहोचल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला असता महादेवमाळ घाटातील उतारावर रस्त्याच्या कडेला त्यांची अपघातग्रस्त दुचाकी (एम.एच.19 बी.टी.2079) व मृतदेह आढळला. अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पाटील यांच्या मृतदेहाजवळ अवजड वाहनाच्या काचा पडल्याने अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.निरीक्षक अमोल पवार, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्यांनी धाव घेत पाहणी केली.








