सावद्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण : तिघांना दोन कोटी 17 लाखांचा दंड
Illegal minor mineral mining case in Sawada : Three fined Rs 2 crore 17 lakhs सावदा : शासनाचा कोणताही परवाना न घेता आणि स्वामीत्वधनाची रक्कम बुडवून अवैध गौणखनिज उपसा केल्याप्रकरणी सावदा शहरातील तीन जणांना महसूल प्रशासनाने तब्बल दोन कोटी 17 लाखांचा दंड सुनावल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे नेमके प्रकरण
रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सावदा हद्दीतील दोघांवर गौणखनिज उपसा प्रकरणी मोठी कारवाई केली. यात सावदा शिवारातल्या हद्दीत असणार्या गट क्रमांक 1051 मधील बेला कैलास खंडेलवाल आणि शेख आशिक शेख निसार तसेच शेख अदनान शेख निसार या तिघांच्या नावांवर एकूण 0.74 आर क्षेत्रफळाची जमीन आहे. येथे अवैध माती आणि मुरूमाचा उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने महसूल खात्याने तपासणी केली असता येथे तब्बल एक हजार 750 ब्रास इतका मुरूम आढळून आला. याचा नियमानुसार पंचनामा करून याची मोजणी करण्यात आली होती. या संदर्भात संबंधीतांना नोटीसा बजावून त्यांचे कारण देखील जाणून घेण्यात आले.






दंडात्मक कारवाईने उडाली खळबळ
जप्त मुरूमाचे मूल्य हे एक कोटी 98 लाख 14 हजार 868 इतके असल्याने स्वामीत्व धन आणि जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठानसाठीचे एकूण मूल्य 19 लक्ष 81 हजार 487 रूपये इतके जोडून संबंधिताना एकूण दोन कोटी 17 लक्ष 96 हजार 955 रूपये इतका दंड ठोठावण्यात आला. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी याबाबतचे आदेश काढल्े आहे. रावेर तालुका व परीसरात महसूल खात्यातर्फे इतक्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची ही कदाचित पहिलीच कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे.


