कत्तलीसाठी गुरे नेत असल्याच्या संशयातून वाहन जाळले : चौघांना अटक
Cattle transporting truck burnt: Four accused in Amalner in crime branch’s net जळगाव : कत्तलीसाठी गुरांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयातून चांदणी-कुर्हा रस्त्यावर सात संशयीतांनी वाहन जाळल्याची घटना रविवार, 12 रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाअंती चार आरोपींना अटक केली आहे. अक्षय सुनील पाटील, निखील चंद्रशेखर पाटील, चेतन रवी्ंर पाटील, भटु दिलीप पाटील (रा.शनीपेठ वर्णेश्वर महादेव रस्त्यावर पैलाड, अमळनेर जिल्हा जळगाव) अशी संशयीतांची नावे आहेत.
तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
अमळनेर-धरणगाव रस्त्यावरील कुर्हे शिवारात चारचाकी (एम.एच.19 सी.वाय.4297) मधील दहा गुरे उतरवून वाहनाला संशयीतांनी आग लावून पेटवल्याने दोन लाखांचे नुकसान झाले होते तर तरुणांच्या मारहाणीत वाहनाचा चालक जखमी झाला होता. या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास केला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, दीपक शिंदे आदींनी संशयीतांना अटक करीत गुन्ह्यात वापरलेला मारुती एर्टीगा वाहन जप्त केले.








