भुसावळ बाजारपेठ व तालुका पोलिसांची वॉश आऊट मोहिम


भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीत तीन दिवसात तब्बल 24 विक्रेत्यांवर कारवाई : थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची धडक मोहिम

भुसावळ : थर्टी फस्टच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणार्‍यांसह अवैध धंदे चालकांविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने व पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुका पोलिस ठाणे व बाजारपेठ पोलिसांनी एकाच दिवसात 10 ठिकाणी दारू जप्त केल्याने अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुमारे 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

तालुका पोलिसांच्या कारवाईने खळबळ
भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वात गेल्या तीन दिवसांपासून अवैध विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. तीन दिवसात 24 विक्रेते आणि जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी दिवसभरात तालुक्यातील सुनसगावला गोपाळ भुरा सोनवणे यांच्याकडून गावठी हातभट्टीची एक हजार 750 रुपयांची तर मोंढाळा येथे दिलीप सुलवाडे यांच्या ताब्यातून देशी दारुच्या 676 रूपये किंमतीच्या 13 बाटल्या जप्त करण्यात आल्या. साकेगाव येथे लिलाधर नामदेव सपकाळे यांच्या ताब्यातून एक हजार 540 रुपये किंमतीची 22 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली खडका येथे रवींद्र बाबुराव भिरूड यांच्या ताब्यातून एक हजार 400 रुपये किंमतीची 20 लिटर दारू जप्त करण्यात आली तर गोंभी येथेही तालुका पोलिसांनी कारवाई करीत समाधान कोळी यांच्या ताब्यातून एक हजार 400 रुपये किंमतीची 20 लिटर दारू जप्त करण्यात आली तर साकरी येथून दोन हजार 100 रुपये किंमतीची 30 लिटर दारू सोपान साळुंखे यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. मोंढाळा येथेही सरलाबाई सुरवाडे यांच्या ताब्यातून 624 रुपये किंमतीच्या 12 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. साकेगाव येथेही एक हजार 400 रुपये किमतीची 20 लिटर दारू रवींद्र कोळी यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली.

बाजारपेठ हद्दीतही कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे व डीबी कर्मचारी यांनी हॉटेल जय मल्हारच्या बाजूला सोमवारी सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास चंद्रकांत रघुनाथ महाजन (रा.शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) यास देशी दारूच्या बाटल्या विकताना अटक करण्यात आली. त्याच्याविरूध्द पोलिस कर्मचारी प्रशांत परदेशी यांनी फिर्याद दिली. हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करीत आहे. दुसर्‍या घटनेत सोमवारी 6.50 वाजेच्या सुमारास हॉटेल चाहेलच्या बाजूला लखन आवरे (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) याच्या ताब्यातून 780 रुपये किंमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. उमाकांत पाटील यांनी फिर्याद दिली. हवालदार रवी बिर्‍हाडे पुढील तपास करीत आहे. शहरातील रिंगरोडवरील आरको ट्रान्सपोर्ट समोर पाण्याच्या टाकीजवळ दीपक सीताराम पाटील (रा.गांधी नगर, खडकारोड, भुसावळ) हा सट्टा खेळत असतांना सोमवारी रात्री 9.25 वाजता त्यास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 450 रुपये आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ईश्वर भालेराव फिर्याद दिली. हवालदार किशोर महाजन पुढील तपास करीत आहे.


कॉपी करू नका.