आता मिळणार शंभर रुपयात आनंदाचा शिधा : शिंदे सरकारचा निर्णय
Ananda’s ration of Rs 100 will be available again: the decision of the State Council of Ministers मुंबई : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. एकनाथ शिंदेंना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार, 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
