भुसावळ 660 मेगावाट क्षमतेच्या वीज प्रकल्प कामांचा वेग अधिक वाढवा : डॉ.पी.अनबलगन
भुसावळ : महानिर्मितीच्या चवथ्या 660 मेगावाट प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्प विषयक कामांचा वेग अधिक वाढवावा असे निर्देश महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी महानिर्मिती आणि मेसर्स भेल अधिकार्यांना दिले. त्यांनी सोमवारी सकाळी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या 660 मेगावाट वीज प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जी.टी.आर.बस डक्ट उभारणी, मेन कंट्रोल रूममधून बॉयलर फील पंप, कॉम्प्रेसर, एफ.डी.फॅन यांचे चाचणी कार्यान्वयन, वॅगन टिपलर उभारणी कामांचा प्रारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांचे सोबत महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ.नितीन वाघ, मुख्य अभियंते विवेक रोकडे, मोहन आव्हाड, पंकज नागदेवते, दत्तात्रय साळुंखे, स्थापत्य सल्लागार ज्ञानोबा मुंडे, उप मुख्य अभियंता संजय कुर्हाडे तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक अरुमोय मुखर्जी, महाव्यवस्थापक सी.के.निमेश, प्रकल्प संचालक जवादे तसेच मेसर्स भेलच्या सब एजन्सीचे सर्व वरीष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी, वीज प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर आधारीत संगणकीय सादरीकर सादर करण्यात आले. यानंतर डॉ.पी.अनबलगन यांनी भुसावळ 500 मेगावॅट संच क्रमांक 4 व 5 ला भेट दिली आणि अभियंत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

भुसावळ हे तिसरे महत्त्वाचे केंद्र
अभियंत्यांशी संवाद साधताना डॉ.अनबलगन म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकाने कार्यक्षमतेत वाढ करावी, रास्त दरात महत्तम वीज उत्पादनाचे ध्येय उराशी बाळगावे, नवनवीन संकल्पना राबवणे सोबतच वीज क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि ज्ञानार्जन करणे तितकेच गरजेचे आहे. औष्णिक वीज निर्मिती हे आपले बलस्थान असल्याने जीव लावून काम करा, वीज उत्पादनाच्या राष्ट्रीय कार्यात आपण खारीचा वाटा उचलतोय याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. आपल्या संचाचा भारांक 80 ते 90 टक्के ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करा. महानिर्मितीमध्ये चंद्रपूर आणि कोराडी नंतर आता भुसावळ वीज केंद्र हे तिसरे महत्वाचे औष्णिक केंद्र ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्प विषयक कामाजा दर्जा कायम ठेवून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावीत असे त्यांनी सांगितले. प्रकल्प विषयक प्रगतीपथावरच्या कामांची माहिती तसेच दैनंदिन अडचणींवर मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी प्रकाश टाकला तर मेसर्स भेल च्या अधिकार्यांनी संबंधित सब एजन्सी सोबत समन्वय बैठका घेऊन कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठो कसोशीने प्रयत्न करावा असे संचालक (प्रकल्प) अभय हरणे यांनी निर्देश दिले.
यांची होती उपस्थिती
भेटी दरम्यान उप मुख्य अभियंते आर.एम. दुथडे, संतोष वकारे, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन, किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर, योगेश इंगळे, पराग आंधे, सुमेध मेश्राम, सुनील पांढरपट्टे, महेंद्र पचलोरे, अतुल पवार, उप मुख्य औद्योगीक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम, कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे, सीमा महाले वरिष्ठ व्यवस्थापक (वि व ले) प्रामुख्याने उपस्थित होते.
