विटनेरमध्ये पाकिस्तानी ध्वज फडकल्याचा आरोप : गुन्हा दाखल करण्याचे जळगाव एमआयडीसी पोलिसांना न्यायालयाचे आदेश
Pakistani flag hoisted at Vitner’s Mazar : MIDC police ordered to register a case जळगाव : तालुक्यातील विटनेर येथील एका प्रार्थनास्थळावर (मजार) पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवार, 18 जानेवारी 2022 रोजी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते. एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती कळाल्यानंतर त्यांनी ध्वज ताब्यात घेतला होता मात्र या प्रकरणी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल करण्यात न आल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत होता. हा प्रकार देशद्रोहात मोडला जाणारा असताना पोलिसांच्या एकूणच भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने विश्व हिंदू परीषद, बजरंग दलाचे जिल्हा कार्यकर्ता हेमंत गणेश गुरव (लोहारा, ता.पाचोरा) यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत.
असे आहे नेमके प्रकरण
जळगाव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील विटनेर येथे एका प्रार्थनास्थळावर (मजार) वर प्लंबर गोपाळ सुपडू कहार (नेरी, ता.जामनेर) यांनी पाकिस्तानच्या ध्वजासारखा ध्वज लावल्याची बाब उघडकीस आली होती. बुधवार, 18 जानेवारी रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदूतत्वादी कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले होते व त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी गोपाळ कहार यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्याला स्वप्न पडल्याचे सांगून प्रार्थनास्थळावर (मजार) ध्वज नसल्याने तो लावण्याची आज्ञा झाल्याने आपण हा ध्वज लावल्याचे त्यांनी कबुली दिली मात्र असा ध्वज हा पाकिस्तानचा असतो, अशी आपल्याला कल्पनाही नसल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले होते.

हा तर देशद्रोहाचा प्रकार : न्यायालयात याचिका
विटनेर गावातील दर्ग्यावर पाकिस्तानी ध्वज लावण्याचा प्रकार म्हणजेच देशद्रोह असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदूतत्वादी संघटनांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका न घेतल्याने विहिंपचे पदाधिकारी हेमंत गणेश गुरव (लोहारा, ता.पाचोरा) यांनी जळगाव न्यायालयात अॅड.केदार भुसारी व अॅड.धनराज झोपे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती. या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर जादु/टोणा, अंधश्रद्धा पसरविण्यासारखे प्रकार चालतात, अशी ओरडही स्थानिकांकडून होत असल्याचा दावा गुरव यांनी केला शिवाय व देशविरोधी राष्ट्राचा झेंडा लावल्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
