भरधाव कारने मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या दोघा भाविकांना चिरडले : चाळीसगाव तालुक्यातील घटना
कार चालकाविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा : दोन जण जखमी
A speeding car crushed two devotees sitting on the back of a temple : an incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : तालुक्यातील ओझर येथे भरधाव अनियंत्रीत कारने मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या ग्रामस्थांना धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संजय फकिरा मंजाळ (42) व गोरख हरिश्यंद्र पवार (37) अशी मृतांची तर सुधीर काशीनाथ चौधरी व युवराज फुला गोलाईत अशी जखमींची नावे आहेत.
अनियंत्रीत कार धडकल्याने अपघात
संजय मंजाळ, गोरख पवार व सुधीर चौधरी हे ओझर येथे ओझर गावातील जुन्या बस स्टॅन्ड जवळ देवीच्या मंदीराच्या ओट्यावर बसले असताना गुरुवारी दुपारी दोन वाजता भरधाव टाटा नेक्सॉन (क्र. एम.एच.19 सी.यु 5383) वरील चालक सागर बाळासाहेब वाबळे (मुंदखेडा, ता.चाळीसगाव) याने धडक दिल्याने संजय मंजाळ व गोरख पवार यांचा जागीच मृत्यू ओढवला तर सुधीर काशीनाथ चौधरी व युवराज फुला गोलाईत हे जखमी झाले. दरम्यान, कार चालक वाबळे याने या अपघातपूर्वी दुचाकीस्वार युवराज फुला गोलाईत यालादेखील धडक दिल्याची बाब उघडकीस आली आहे.






कार चालकाविरोधात गुन्हा
अपघात प्रकरणी कार चालक सागर बाळासाहेब वाबळे (मुंदखेडा, ता.चाळीसगाव) विरोधात विशाल साहेबराव गायकवाड (ओझर) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय मंजाळ, गोरख पवार हे मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या अपघातात दोन कुटूंबांनी आपला आधार गमविला असून ओझर गावात हळहळ व्यक्त होत आहे.


