वाचनाच्या बळावर इतिहास घडवायला सज्ज व्हा


रावेरात संभाजी ब्रिगेडचे प्रचारक व व्याखाते प्रदीप साळुंके यांचे आवाहन

रावेर : पुस्तकांच्या वाचनाने विचारांच्या माध्यमातून इतिहास घडविता येतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. युवकांनीही वाचनाच्या बळावर इतिहास घडवायला सज्ज व्हावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रचारक व व्याखाते प्रदीप साळुंके यांनी येथे केले. निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे येथील छोरीया मार्केटमध्ये शौर्य दिनानिमित्त आयोजित संभाजी राजे व ‘भीमा कोरेगाव एक शौर्य गाथा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांना व उभारलेल्या विजय स्तंभाला माल्यार्पण करून करण्यात आली.

यांची विचार मंचावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले होते. व्यासपीठावर उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, नायब तहसीलदार चंदू पवार, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, हिरालाल सोनवणे, अ‍ॅड.योगेश गजरे, अ‍ॅड.सुभाष धुंदले उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर व पदाधिकार्‍यांनी पुस्तक भेट देऊन केले.

एकसंघ झाल्यास समाजातील तंटे कमी होणार
साळुंके पुढे म्हणाले की, काही ठिकाणे ही पूर्वजांनी केलेल्या पराक्रमांची असून त्याकडे प्रेरणेच्या दृष्टीकोनातून पहिले पाहिजे. सर्वांनी एकसंघ झाल्यास समाजातील तंटे आपोआपच कमी होतील. पूर्वी इतिहास घडविणारे व इतिहास लिहिणारे वेगळे होते त्यामुळे अनेक पराक्रमांचा खरा इतिहास समाजासमोर आलाच नाही. युवकांनी पुस्तके वाचली पाहिजेत त्यातूनच भावी इतिहास घडणार आहे. इतिहास आपणच घडवा व आपणच लिहा, असे आवाहन त्यांनी केले. धर्माच्या नावाखाली झालेल्या अन्यायाचा बदला म्हणजे ‘भीमा कोरेगावचे युद्ध’ होते असे साळुंके यांनी सांगितले.

व्यासपीठावर फक्त मान्यवर
कार्यक्रमाचे आयोजक असलेले निळे निशाण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्यासह सर्व पदाधिकारी व्यासपीठावर न बसता व्यासपीठासमोर बसले होते. या नवीन पाडलेल्या पायंडाची कार्यक्रम स्थळी चर्चा होती. सूत्रसंचलन नगीन इंगळे यांनी केले. दरम्यान, शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची 25 फूट उंचीची उभारलेली व फुलांच्या माळांनी सजविलेली प्रतिकृती लक्षवेधक ठरली.


कॉपी करू नका.