भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात बोगस भरती !
जयश्री न्याती यांची शहर पोलिसांकडे तक्रार : प्राचार्यांचे कानावर हात
Bogus recruitment in college of PK Kote in Bhusawla? भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात बोगसरीत्या शिक्षकांची भरती करण्यात आल्याची तक्रार श्री सरस्वती प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष जयश्री शालिग्राम न्याती यांनी भुसावळ शहर पोलिसांकडे केली असून या संदर्भात दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
प्राचार्यांसह कार्यकारीणी सदस्यांवर आरोप
न्याती यांच्या तक्रारीनुसार, महाविद्यालयात नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत खोटे व बनावट दस्तावेज तयार करून महेश अरविंद चौधरी व रुकसाना बी.ताजम्मुल हुसेन यांची वाणिज्य शिक्षक म्हणून शिक्षण सेवक पदावर भरती करण्यात आली. संस्था चालकांना अधिकार नसताना त्यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्य माध्यमिक उच्च मंडळाकडे कागदपत्रे सादर करून संंबंधितांनी पगारदेखील लाटले आहेत.

बनावट नियुक्ती पत्रांद्वारे केली शासनाची फसवणूक
विशेष म्हणजे 2014 ते 2022 या सात वर्षांच्या कालावधीत संबंधित कर्मचारी महाविद्यालयात कधीही उपस्थित राहिले नाहीत मात्र बनावट उपस्थितीद्वारे त्यांना हजर दाखवण्यात आले. रुकसानाबी या 2013 ते 2021 दरम्यान ताप्ती स्कूलमध्ये तर महेश चौधरी हे ठाण्यातील एका शाळेत कार्यरत होते. 2017 व 2019 या बिंदू नामावली तपासणी अहवालात ही पदे रीक्त दर्शवण्यात आल्याने प्राचार्यांनी शिक्षक भरती केली नाही हे दिसून येते मात्र बनावट नियुक्तीपत्राद्वारे नियुक्त्या करून शासनाची फसवणूक करण्यात आली असून अनुदानही लाटण्यात आल्याचा आरोप न्याती यांनी केला आहे. दरम्यान, या संदर्भात प्राचार्य मंगला साबद्रा यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, या प्रकाराशी आपला कुठलाही संबंध नाही वा आपल्याला काहीही माहिती नाही.
