प्रशासकीय मान्यतेनंतर भुसावळात होणार रस्त्यांची कामे

मुख्याधिकार्यांची सत्ताधारी नगरसेवकांना माहिती
भुसावळ : पाच कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे प्रशासकिय मंजूरीसाठी पाठवली असून मंजुरीनंतर तत्काळ प्रक्रिया करून कामांना सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सत्ताधारी नगरसेवकांना दिली. बुधवारी विषय समिती सदस्य निवडीनंतर सत्ताधार्यांनी मुख्याधिकार्यांची भेट घेत नवीन वर्षात तरी शहरातील रस्त्यांचा प्रश्न सुटणार का? अशी विचारणा केली.
पाच महिन्यानंतरही सर्वसाधारण सभेला मुहूर्त नाही
सत्ताधारी गटाचे नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, पाणीपुरवठा सभापती महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, रमेश नागराणी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, देवेंद्र वाणी, दिनेश नेमाडे, किशोर पाटील आदींनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांची भेट घेत पालिकेची सर्वसाधारण सभा होत नसल्याने शहरात कोणतेही विकासात्मक कामे होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. शहरातील रस्त्यांसाठी 17 कोटींचा निधी होता मात्र यातील केवळ पाच कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी घेतली जात आहे. यातून कोणत्या भागातील व किती रस्ते होणार? याबाबतची माहिती नगरसेवकांना नाही. उर्वरीत 12 कोटींच्यया निधीचे काय? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी 12 कोटी रुपयांचा निधी शासनाकडे परत जावू नये, यासाठी मुदतवाढ घेतली जाणार असल्याची माहिती दिली. नगरसेवक किरण कोलते यांनी मुख्याधिकार्यांनी वारंवार सुटी घेवू नये, आपण सुटी घेतल्यावर पालिकेचे अन्य कर्मचारीही सुटी घेतात व कामाचे नियोजन बिघडते. प्रभारी मुख्याधिकार्यांच्या काळात पालिका फंडातून बिले अदा होऊन कामकाजाची घडी बिघडते आदी प्रश्नांवरही लक्ष वेधले. नगराध्यक्षांनतर सर्वसाधारण सभा घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांकडे आहेत, अशी माहिती मुख्याधिकार्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.


