यावलमध्ये एस.टी.वाहकाकडून विद्यार्थिनीला मारहाण

यावल : शाळकरी विद्यार्थिनीलाच कंडक्टरने मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, आगार व्यवस्थापकांनी संबंधित वाहकाचे निलंबन केले जाणार असल्याचे सांगितले. यावल आगाराची बस (9974) मधून पौर्णिमा मुरलीधर धांडे ही शशिकांत सखाराम चौधरी कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी यावल ते चितोडा प्रवास करीत असताना बसमधील वाहक निळे यांनी विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर चितोडा ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करीत कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी मुरलीधर धांडे, जयश्री पाटील, मनोज धांडे, निखील पाटील, मयुर भंगाळे, नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रकरणी यावल पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


