फडणवीसांसह महाजनांच्या नाराजीमुळे तिकीट नाकारले


माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंचा आरोप

जळगाव : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आपल्याला तिकीट नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ही माहिती कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला दिल्याचे खडसे यांनी म्हटल्याने भाजपाच्या राजकीय गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे. पक्षाशी गेल्या 40 वर्षात अतयंत प्रामाणिकपणे काम केल्याने घाबरण्याचे वा माघार घेण्याचे काम नाही, असेही खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले भाजपातच राहणार
खडसे म्हणाले की, आपण जे.पी.नड्डा यांच्या भेटीत त्यांना सर्व सांगितलं आहे. त्यांनी माझ्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याचं आश्वासन मला दिलं आहे. त्यांच्या भेटीत माझं पूर्ण समाधान झालं असं नाही. मात्र मी भाजपतच आहे आणि भाजपतच राहणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपचं सरकार महाराष्ट्रात निश्चित आलं असतं. मात्र जनाधार असलेल्या निष्ठावानांना तिकीट दिलं नाही. जनाधार नसलेल्या बाहेरच्या उमेदवारांना तिकीटं देण्यात आली. आमच्याच उमेदवाराच्या समोर आमचेच बंडखोर उभे राहिले त्याचा फटका पक्षाला बसला, असेही खडसे म्हणाले.


कॉपी करू नका.