के.सी.पार्कजवळ दुचाकी धडकल्या : आमोद्यातील दुचाकीस्वार ठार
Two-wheeler collides near KC Park: Bike rider from Amodia killed जळगाव : भरधाव दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात आमोद्यातील दुचाकीस्वार ठार झाला तर तिघे जखमी झाले. हा अपघात कानळदा रोडवरील के.सी.पार्क जवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता घडला. अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) मृत तरूणाचे नाव आहे.
समोरा-समोर आदळल्या दुचाकी
जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावातील डंपर चालक असलेला गणेश सपकाळे हा आसोदा येथील मालकाकडे मंगळवारी कामाला गेल्यानंतर रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (आमोदा खूर्द) याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे येत असताना कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला तर समाधान बाविस्कर आणि समोरील दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपूते (कांचन नगर, जळगाव) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.

शहर पोलिसात नोंद
या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसानही झाले. बुधवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत तरुणाच्या पश्चात आई उषा, वडील सोमा गोविंदा सपकाळे, लहान भाऊ गोपाल, पत्नी छाया, मुलगा जयेश आणि मुलगी असा परीवार आहे. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
