खडसेंच्या अडचणी वाढल्या : ‘या’ प्रकरणाची आता एस.आय.टी.करणार चौकशी
400 Crore Scam Allegation: SIT will conduct thorough investigation now मुंबई : आमदार एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणार्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केला होता. त्यानंतर एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून देण्यात आल्यानंतर सातोड प्रकरणात आता नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन अन खडसेंच्या वाढल्या अडचणी
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकीकडे सरुू असतानाच सातोड प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमिनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले होते की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्यांनी याला तत्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता.

विभागीय आयुक्तांकडून होणार चौकशी
या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. या मागणीनुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केली आहे. विभागीय आयुक्तांना एसआयटीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार असतील. या बाबतचे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे.
