जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध : नागपूर कारागृहात रवानगी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ


Notorious criminals from Jalgaon arrested : Sent to Nagpur Jail जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवी टोळींसह गुन्हेगारांविरोधात जिल्हा पोलिस दलाने मोहिम उघडली आहे. या संदर्भातील प्रस्तावानंतर शहरातील एका गुन्हेगाराला जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. समीर हनीफ काकर (तांबापुरा, जळगाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून त्याच्याविरोधात शरीराविरोधात ईजा केल्यासह अन्य विविध गंभीर कलमान्वये 11 गुन्हे दाखल आहेत. आदेश मिळताच पोलिसांनी संशयीताचे नागपूर कारागृहात रवानगी केली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
संशयित काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, गर्दीसह दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घरफोडी आदी विविध प्रकारचे तब्बल 11 गुन्हे एमआयडीसी, रामानंद नगर व शहर पोलिसात दाखल आहेत. संशयीताची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पाहता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी संशयीताला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे पाठवला व पडताळणीअंती तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला. मंगळवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी संशयीतावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत आदेश पारीत केले.

संशयीताची नागपूरात रवानगी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक जयपाल हिरे व पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन पाटील, इमरान सैय्यद, इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील समीर काकर याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !