भुसावळसह तालुक्यातील 12 केंद्रावर दहावी परीक्षा
परीक्षेवर भरारी पथकांची असेल नजर : पोलिसांचाही काटेकोर बंदोबस्त
भुसावळ : शहरासह तालुक्यातील 12 परीक्षा केंद्रावर गुरुवार, 2 मार्चपासून दहावी परीक्षेला प्रारंभ होत आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी शिक्षण विभागाने परीक्षेसंदर्भात नियोजन करून संबंधिताना योग्य त्या सूचना केल्या आहेत. परीक्षेवर भरारी पथकाची करडी नजर राहणार असून पोलिसांचादेखील काटेकोर बंदोबस्त असणार आहे. परीक्षेसाठी शहरात सात तर वराडसीमसह तालुक्यात एकूण 12 केंद्र असून त्यात चार हजार 536 परीक्षार्थी परीक्षा देतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
भुसावळात सात परीक्षा केंद्र
भुसावळातील सेंट अलॉयसीस, म्युन्सीपल हायस्कूल, डी.एल.हिंदी विद्यालय, श्री संत गाडगे महाराज हायस्कूल, डी.एस.हायस्कूल, बियाणी स्कूल, बी.झेड.उर्दू या सात केंद्रासह तसेच तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, आयुध निर्माणी वरणगाव शाळा, गंगाधर सांडू चौधरी विद्यालय, सर्वोदय माध्यमिक विद्यालय, किन्ही व वराडसीम येथेही परीक्षा होत आहे. भुसावळसह वराडसीम केंद्रावर तीन हजार 351 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असतील. दरम्यान, परीक्षेच्या आदल्या दिवशी बुधवारी विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांमध्ये बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गर्दी केली होती.

11 वाजता मिळणार उत्तरपत्रिका
परीक्षार्थींनी यांनी 10.30 पर्यंत शाळेत हजर राहणे अनिवार्य असून 10.50 वाजता त्यांना हॉलमध्ये उत्तर पत्रिका दिली जाईल तसेच 11 वाजता परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका दिली जाईल व 11 ते 2.10 या वेळेत परीक्षा होईल. दरम्यान, परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये जातांना कोरा कागद, कॅल्युलेटर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ या वस्तू नेण्यास मज्जाव असेल.
न्हावी परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था जाहीर
न्हावी : दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र क्रमांक 3675 भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्र संचालिका तिलोत्तमा चौधरी यांनी दिली. या परीक्षा केंद्रावर मराठी माध्यमासाठी भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शारदा माध्यमिक विद्यालय, जागृती विद्यालय हंबर्डी व उर्दू माध्यमासाठी खानदेश उर्दू हायस्कूल, आयडियल उर्दू हायस्कूल, मारूळ आणि इंग्रजी माध्यमासाठी जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल न्हावी मार्ग फैजपूर इत्यादी विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षा देतील. मराठी माध्यमासाठी डी.195774 ते डी.196257-192, उर्दू माध्यमाकरीता डी.-195980 ते डी.196260-229 व इंग्रजी माध्यमाकरीता डी.195916 ते डी.195979-64 असे एकूण तीनही माध्यमांचे 485 विद्यार्थी या केंद्रावर परीक्षेस प्रविष्ट आहेत.
मुक्ताईनगरातील केंद्र क्रमांक 3350
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरातील केंद्र क्रमांक 3350 ची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. 849 विद्यार्थी प्रविष्ट असून त्यांची आसन व्यवस्था जगजीवनदास इंग्लिश स्कूल (जे.ई.स्कूल) मुक्ताईनगरच्या मुख्य इमारतीत व ज्युनियर कॉलेज व एमसीव्हीसीच्या इमारतीत करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी पेपरच्या दिवशी सकाळी 9.30 वाजता केंद्रावर उपस्थित राहावे तसेच 10.30 वाजता परीक्षागृहात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे केंद्र संचालक एन.पी.भोंबे यांनी सांगितले. प्राचार्य आर.पी.पाटील, मुख्याध्यापक राणे, केंद्र संचालक एन.पी.भोंबे, उपसंचालक व्ही.एम.लोंढे, जे.जे.पाटील, पर्यवेक्षक शरद महाजन, आर.बी लवांडे, एल.एस.भोई आदी परीश्रम घेत आहेत. दरम्यान, मराठी विषयासाठी ब्लॉक नं. 1 ते 22 मेन बिल्डिंग जे.ई. स्कूल, 23 ते 33 ज्युनियर कॉलेज, इंग्रजी विषयासाठी ब्लॉक नं.1 ते 26 मेन बिल्डिंग जे.ई. स्कूल, 27 ते 35 ज्युनियर कॉलेज, हिंदी विषयासाठी ब्लॉक नं.1 ते 25 मेन बिल्डिंग जे.ई. स्कूल तसेच 26 ते 29 ज्युनियर कॉलेज जे.ई.स्कूलमध्ये परीक्षा होईल.
