पावणेदोन लाखांच्या बनावट नोटासंह कुसूंब्यातील संशयित जाळ्यात


Suspects caught in Kusumba with fake notes worth Rs 2 lakh जळगाव : हमाली काम करताना शॉर्टकर्ट श्रीमंत होण्याच्या नादात एकाने युट्यूब चॅनलवर बनावट नोटा बनवण्याचे प्रशिक्षण घेत कलर प्रिंटर आणून घरीच बनावट नोटांची छपाई सुरू केली मात्र पोलिसांना माहिती कळताच संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीतांकडून एक लाख 68 हजार 900 रुपये किंमतीच्या 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. देविदास पुंडलिक आढाव (30, कुसुंबा, जि.जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलीस नाईक राहुल बैसाने यांना संशयीत बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना माहिती कळवल्याने पथकाने सापळा रचून घरातच नकली नोटा छपाई करणार्‍या देविदास पुंडलिक आढाव याच्याकडे डमी ग्राहक पाठवून त्यास अटक केली. पोलिस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पावणेदोन लाखांच्या नोटा जप्त
पथकाने देविदास आढाव यांच्याकडून 100, 200 आणि 500 च्या 1 लाख 68 हजार 900 रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या तसेच त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले आहेत. आढाव याच्याकडून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस कर्मचारी महेश महाले, रवींद्र मोतीराया, निलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !