भुसावळात मराठीच्या पेपराला 39 विद्यार्थ्यांची दांडी

दहावी परीक्षेला शांततेत सुरूवात : भरारी पथकांकडून शाळांना भेट


39 students fail for Marathi paper in Bhusawal भुसावळ : दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून शहरातील सात परीक्षा केंद्रावर शांततेत सुरूवात झाली. शहरासह वराडसीम येथील केंद्रावर दोन हजार 584 परीक्षार्थींनी पेपर दिला तर पहिल्याच मराठीच्या पेपराला 39 परीक्षार्थींनी दांडी मारली.

गुरूवारपासून शहरातील सात परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षेला शांततेत सुरूवात झाली आहे. सकाळी 10.30 वाजताच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. शहरातील सेंट अलॉयसीस शाळेत विद्यार्थ्यांना ओळखपत्रही वर्गाबाहेर ठेवण्याचे सांगितल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमधून संतापाची लाट व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाकडे या संदर्भात तक्रारी आल्यानंतर गटशिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित शाळेला सूचना केल्याचे किशोर वायकोळे म्हणाले.

पहिल्याच पेपराला 39 विद्यार्थ्यांची दांडी
भुसावळ शहरातील सात व वराडसीम येथील एक अश्या आठ शाळांमध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली असून दोन हजार 623 पैकी दोन हजार 584 विद्यार्थ्यांनी गुरुवारी मराठी विषयाची परीक्षा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली तर 39 परीक्षार्थी गैरहजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. शाळेच्या परीसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पहिल्या पेपरला एकही कॉपी केस झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील डी.एस.विद्यालयात कॉपी पुरवणार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर धडपड केल्याचे दिसून आले.

ओळखपत्र नेण्यास मज्जाव
शहरातील यावल रोडवरील सेंट अलॉयसीस शाळेत परीक्षार्थींना वर्गात ओळखपत्र नेण्यासदेखील मज्जाव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी सोबत रीसीट, ओळखपत्र, पाण्याची बाटली, पॅड नेण्याच्या बोर्डाने सूचना दिल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली. संबंधित शाळेला समज देण्यात आल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !