धक्का लागल्याच्या वादातून विरवाडेतील तरुणाचा खून
तिघांना अटक : एका संशयीतावर रुग्णालयात उपचार
The murder of a young man in Virwade due to a dispute over shock चोपडा : धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करीत चाकू मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील विरवाड येथे गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. या घटनेत भोजु वासुदेव कोळी (32, विरवाडे) याचा मृत्यू ओढवला असून या प्रकरणी चोपडा पोलिसात पाच संशयीतांविरोधात चोपडा शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून एका संशयीतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरकोळ वादातून तरुणाचा खून
विरवाडे गावातील सबस्टेशनजवळ संशयित आरोपी सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी व शोभाबाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे) यांनी संगनमत करुन संशयित दीपक कोळी व तक्रारदार यांचा मुलगा भोजु कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणातून वाद निर्माण करीत भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली होती व संशयित सागर कोळीने राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारुन दुखापतही केली होती. हा राग मनात ठेवत संशयितांनी रात्री नऊ वाजेदरम्यान फिर्यादीच्या घरी जात संशयित आरोपी सागर देविदास कोळी याने त्याचे जवळील चाकुने भोजु कोळी याचे मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी सपासप वार केल्याने भोजू कोळीचा मृत्यू ओढवला.

तिघांना पोलिसांकडून अटक
या प्रकरणी वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली तर आरोपी सागर कोळी याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
