फैजपूर शहरात 7 मार्चपासून खंडोबा देवस्थानचा यात्रा महोत्सव
प्रति जेजुरी मंदिराला ऐतिहासिक धार्मिक : राष्ट्रभक्तीचा वारसा
Yatra festival of Khandoba Devasthan from March 7 in Faizpur city फैजपूर : प्रति जेजुरी म्हणून परीचीत असलेल्या व सुमारे 460 वर्षांपूर्वीच्या पुरातन जागृत व हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा भगवान देवस्थानचा यात्रामहोत्सव (आठवडाभर) 7 ते 14 मार्च 2023 सालाबदाप्रमाणे मोठ्या साजरा होत आहे. या पुरातन जागृत खंडोबा मंदिरात प.पू.अहिल्याबाई होळकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा, कवयित्री बहिणाबाई चौधरी या सर्व राष्ट्रभक्तांनी आवर्जून भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. आजही या मंदिरात मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध होळकर घराण्याची सनद प्राप्त होते. या मंदिराचे तत्कालीन ब्रह्मलीन गादिपती परमपूज्य आत्मानंददास जी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य विनोबा भावे सोबत भूदान आंदोलनात तर त्यांचे शिष्य महंत ब्रह्मचारी घनश्यामदासजी महाराज यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात आमदार सिंधुताई पार्थ चौधरी यांच्यासोबत गोवा मुक्ती आंदोलनात सिंहाचा सहभाग घेतला होता तसेच त्यांनी येथील नगरपरिषदेमध्ये अखंडितपणे 35 वर्ष नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधित्व जनसेवा रुजू केली आहे.
शिव शंकराचा अवतार कार्य खंडोबा भगवान
पुरातन काळी उन्मत्त झालेले मनी व मल्ल असुरांच्या त्रासापासून देवांसह मानव जातीला मुक्त करण्यासाठी साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणजेच खंडोबा होय या देवस्थानातील पुरातन काळा पाषाणातील अश्वारूढ खंडोबा मूर्ती भग्न झाल्यानंतर पांढर्या शुभ्र संगमवरी पाषाणाची अश्वारूढ खंडोबा महाराजांची मूर्ती व म्हाळसाई, बानाई देवीच्या मूर्ती तत्कालीन गादिपती आत्मानंद महाराज यांना इंदूर राजा नरेश होळकर यांनी राजस्थान येथील रामकुमार जयपूर वाले या मूर्तिकारकडून बनवीत इ.स.7 डिसेंबर 1944 रोजी देऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना फाल्गुन होळी पौर्णिमेला केल्याचा पुरातन शिलालेख आजही मंदिर परिसरावर या ऐतिहासिकतेची साक्ष देतो.

मंदिराची ऐतिहसिक आख्यायिका
पुरातन इतिहास असा आहे की येथून जवळच असलेल्या अडीच किलोमीटर अंतरावरील न्हावी गावातील खंडोबा मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी खंडोबाची मूर्ती बैलगाडीतून नेत असताना या जागी असलेल्या विहिरीवर विश्रामासाठी थांबले असता या बैलगाडीचे चाक जमिनीत फसले. भाविक व ग्रामस्थांनी बैलगाडी काढण्यासाठी तब्बल 51 बैल जोड्यांची मदत घेऊनही बैलगाडी तसूभरही पुढे झाली नाही. ग्रामस्थांना झालेल्या या दृष्टांतानुसार ह्याच जागी मंदिराची ग्रामस्थांनी उभारणी करून फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या शुभ पर्वावर त्या भगवान श्री खंडोबा मूर्तीची काशीच्या ब्राह्मणांकडून होमहवन वेदो मंत्रोपचारात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या धार्मिक जल्लोष साजरा केला. यानंतर खंडोबा मंदिराचा वर्धापन दिवसाला यात्रा महोत्सव साजरा केला जातो व हीच परंपरा ‘फैजपूर खंडोबाची यात्रा’ म्हणून आजही अखंडितपणे पाळली जाते.
नवसाला पावणारे जागृत खंडोबा
नवविवाहित दांपत्य खंडोबाला नतमस्तक होऊन आपले वैवाहिक जीवनात सुखसमृद्धीची मागणी करतात. लग्न बोलणी नवस, बालकांचे जावुळ- कानटोचनीचे धार्मिक विधी, शेतकरी वर्गातून विविध नवस फेडणी केली जाते. खंडोजाबा हे जागृत असून नवसाला पावणारे असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे.
जातीय सलोख्याची पर्वणीच
समस्त लेवा पाटीदार, धनगर, कोळीसह अन्य समाजाचे कुलदैवत तर फैजपूर शहरवासीयांच आराध्य दैवत श्रद्धास्थान आहे. खंडोबा यात्रा महोत्सव म्हणजे एक उत्तम प्रकारची धार्मिक व एकात्मिक जातीय सलोख्याची पर्वणीच असते. हिंदू सोबत मुस्लिम बांधव सुद्धा जागृत खंडोबास नवस बोलणी (मन्नत मानतात) व फेडत मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होताना दिसतात आणि यात्रेमध्ये सुद्धा फैजपूरसह देशभरातील हिंदू-मुस्लिम एकत्रीत येऊन आपपले व्यवसाय थाटतात शिवाय लोकनाट्याच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त
आत्मानंद महाराजांचे शिष्य तथा माजी उपनगराध्यक्ष व सलग 35 वर्षे नगरसेवक असणारे बालब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांनी मंदिराचा भव्यदिव्य जीर्णोद्धार कार्य केलेच मात्र देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून घेतला. शहरवासीयांसाठी तब्बल पाच भव्यदिव्य मंगल सभागृह, भक्तीनिवास उभारण्यात आले आहेत. दूध व शेती व्यवसायात त्यांची विशेष ख्याती होती. काही वर्ष त्यांनी शिशु विहार केंद्र तर्फे बालमनावर धार्मिक संस्कार केले तर गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी आमदार सिंधुताई पार्थ चौधरी सोबत सिंहाचा सहभाग उचलला होता.
यात्रोत्सवावर सीसीटीव्हीची नजर
कोरोना काल खंडानंतर प्रथमच होणार्या यात्रोत्सवावत कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी व महिलांची होणारी छेडखानी तसेच टवाळखोरी व चोर्या रोखण्यासाठी पोलिस दलाने होमगार्ड, स्वयंसेवक तसेच पोलिसांसह मोठ्या ताफ्यासह जागोजागी सीसीटीव्ही लावले आहेत. फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे, सहा.निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन लोखंडे, शेख, फौजदार हेमंत सांगळे आदींनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
बसेससह आरोग्य सुविधा
मुख्य मंदिरा समोरच नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी व शहरातील डॉक्टर भाविकांना काही त्रास उद्भवल्यास सेवा देतील तसेच यावल, रावेर, जळगाव, भुसावळसह जिल्हा भरातील सर्वच बस आगारातून तर मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथून सुद्धा यात्रोत्सवासाठी विशेष अतिरीक्त बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
