मोठा दिलासा : बारावी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत आता सहा गुण मिळणार
12th-students-will-get-6-marks-decision-announced-by-state-board-of-education मुंबई : बारावी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून इंग्रजीच्या पेपरमध्ये त्रुटी असलेल्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर मंडळाकडून झालेल्या चुकीमुळे अन्याय होणार नाही, असे मंडळाकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्याच इंग्रजीच्या पेपरात राज्य शिक्षण मंडळाकडून झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर 3 मार्च रोजी इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाने प्रमुख नियामक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती.
अहवालाअंती मंडळाकडून निर्णय
बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता 80 गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक 3 मध्ये 14 गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. सोमवारच्या प्रश्नपत्रिकेत र-3,र-4, र-5 या तीन कृतींमध्ये दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर एका प्रश्नांऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले तर काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. मंडळाने तयार केलेल्या ‘नमुना उत्तरपत्रिका म्हणजेच मॉडेल आन्सर’ मधील र-3, र-4, र-5 ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली होती. विद्यार्थ्यांनी या संभ्रमात प्रश्नच न समजल्याने उत्तरे टाळली आणि त्यांचे गुण आता वाया जाणार अशी भीती त्यांना वाटू लागली. यामुळे मंडळाने या प्रश्नाचे सरसकट गुण विद्यार्थ्याना द्यावेत अशी मागणी पालक , शिक्षकांमधून होत होती. या पार्श्वभूमीवर संयुक्त सभा घेऊन त्याच्या अहवालानुसार निर्णय घेतला जाईल असे मंडळाने सोष्ट केले होते. त्यामुळे अहवालानंतर आता मंडळाकडून गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

गुण कोणाला मिळणार ?
खालील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनि केले असल्यास, विद्यार्थ्यास प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 06 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
1. कविता विभाग/ कविता प्रश्न क्रमांक असा केवळ उत्तरपत्रिकेमध्ये उल्लेख केला असल्यास
2. पोईट्री सेक्शन दोनमधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्यास
3.असा प्रश्नाचे क्रमांक (–3, –4, –5 असे केवळ उत्तरपत्रिकेत नमुद केले असल्यास.
