भुसावळातील अतिक्रमणासह तक्रारींची अपर जिल्हाधिकार्यांकडून चौकशी
नागरीकांच्या तक्रारीची जिल्हाधिकार्यांकडून दखल : अहवालाअंती होणार कारवाई
Investigation of complaints including encroachment in Bhusawal by Additional Collector भुसावळ : सार्वजनिक शौचालयामुळे होणार्या दुर्गंधीबाबत तसेच जामनेर रोडवरील अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर या संदर्भात पाहणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकार्यांसह तीन अधिकार्यांचे पथक शनिवारी शहरात धडकल्याने खळबळ उडाली. यावेळी पथकाने संबंधित तक्रारदारांसह नागरीकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर पालिकेतही भेट देत अधिकार्यांकडून आढावा जाणून घेतला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, टाऊन प्लॅनिंगचे जनार्दन पवार, सहायक संचालक राजेश पाटील प्रसंगी उपस्थित होते.
नागरीकांच्या तक्रारीची जिल्हाधिकार्यांकडून दखल
भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजजवळील दगडी पूलाकडे जाणार्या मार्गावर असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या अस्वच्छतेबाबत व रस्त्याबाबत तेथील रहिवासी यांनी लोकायुक्तांकडे तक्रारी केल्याने शौचालयाची दुर्गंधी आणि तेथील रस्त्याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तीन अधिकार्यांची समिती स्थापन करीत पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुषंगाने शनिवारी शनिवारी सकाळी 11 वाजता समिती दाखल झाली. या समितीत अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, टाऊंन प्लॅनिंगचे सहायक संचालक राजेश पाटील, डीपीओ जनार्दन पवार होते. अपर जिल्हाधिकार्यांनी तक्रारदारांशी चर्चा करीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शौचालयाचा होणारा त्रास यावर पालिकेकडून होणारी उपाय योजना याबाबत पालिकेच्या अभियंत्यांशी चर्चा करण्यात आली.

अतिक्रमणाबाबतही केली पाहणी
जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडजवळून श्रीराम नगरकडे जाणार्या 12 फुटी रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार मेडिकल व्यावसायीकाने केल्याने या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. रस्त्याची पाहणी केल्यानंतर 12 फुटी रोड पुढे जाऊन कसा अरूंद झाला त्यातच वाहतुकीच्या रस्त्यात मोठ्या प्रमाणावर वीज कंपनीचे खांब आल्याने वाहतुकीला अडचण येत असल्याचे माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी अपर जिल्हाधिकारी महाजन यांना सांगितले. पालिकेचे नगर अभियंता रूपेश बच्छाव, अभियंता विजय तौष्णीवाल, अभियंता महेश चौधरी, शुभम विसपुते, अक्षय सुरवाडे, व्ही.सी.राठोड आदी उपस्थित होते.
