साकळी जिल्हा परीषद शाळेची माथेफिरुंकडून नासधूस
यावल : तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परीषद मुला-मुलींच्या शाळेत गेल्या दोन दिवसांपासून अज्ञात माथेफिरूने नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. शाळेतील मुख्य प्रवेशद्वार, दरवाजे यांची तोडफोड करण्यात आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना माहिती देण्यात आली.
माथेफिरूंवर कठोर कारवाईची मागणी
साकळी गावातील जिल्हा परीषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत गेल्या दोन दिवसापासून मुख्य प्रवेशद्वार दरवाजे खिडक्या आदींची अज्ञात विकृतांकडून नासधूस झाल्याची संतापजनक बाब उघउकीस आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणीदेखील केली आहे. शाळेतून कुठलेही साहित्य चोरी झाले नसलेतरी केवळ कोणीतरी द्वेष बुद्धीतून येथे नुकसान करीत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दिवशी शाळेच्या एका वर्ग खोलीचा दरवाजा तोडून तीन हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले तर दुसर्या दिवशीदेखील दुसर्या एका वर्ग खोलीचा दरवाजा तोडून टाकण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी यावल पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी मुलींच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश माळी, मुलांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौरभ जैन (सर), ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य खतीब तडवी, सदस्य नितीन फन्नाटे, सचिन सोनवणे यांच्यासह नागरीक उपस्थित होते. दरम्यान, अतिक्रमणामुळे शाळेच्या एका बाजूच्या संरक्षण कुंपाचे रखडले असून वॉल कंपाऊंडचे पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

