भुसावळात पोलिसांच्या नाकाबंदीत दोनशेवर वाहनांवर कारवाई

वाहनधारकांच्या गोटात प्रचंड खळबळ : मद्यपी वाहन चालकांवरही कारवाई


Action on 200 vehicles during police blockade in Bhusawal भुसावळ  शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत शनिवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर वाहनधारकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. शहर व बाजारपेठ हद्दीत सहा पॉईंटच्या द्वारे वाहनधारकांकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली तसेच नियम डावलून वाहने चालवणार्‍या वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या तपासणी मोहिमेमुळे वाहनधारकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, एकूण 680 वाहनांची तपासणी केल्यानंतर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टअन्वये 108 वाहनांवर तर नंबरप्लेट नसलेल्या 79 वाहनांवर तसेच दारू पिवून वाहन चालवणार्‍या सात वाहन धारकांवर कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.

सहा ठिकाणी शहरात नाकाबंदी
भुसावळ शहर हद्दीतील यावल रोडवरील गांधी पुतळा, यावल नाका व समता नगर तसेच बाजारपेठ पोलीस हद्दीतील नाहाटा चौफुली, रजा टॉवर, पांडुरंग टॉकीज भागात स्थानिक पोलिसांसह वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी नाकाबंदी केली. त्यात वाहनांची कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांसह सीटबेल्ट न लावणार्‍या तसेच नंबरप्लेट नसलेल्या व विचित्र नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांनंतर अशा पद्धत्तीने पोलिसांनी कारवाई केल्यानंतर वाहनधारकांमध्ये घबराट पसरली. रात्री उशिरापर्यंत वाहनधारकांविरोधात कारवाईचा जोर सुरूच होता. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, सहा.निरीक्षक हरीष भोये, शहरचे निरीक्षक गजानन पडघण व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !