अकलूदच्या तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रास्ता रोकोने महामार्ग ठप्प ः आरोपींवर कठोर कारवाईचे पोलिसांचे आश्वासन


भुसावळ : पूर्व वैमनस्यातून झालेल्या चाकूहल्ल्यात अकलूद गावातील 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान भुसावळात रविवारी सायंकाळी या तरुणाची प्राणज्योत मालवली. या घटनेंतर चाकूहल्ला प्रकरणातील सर्व सहा आरोपींवर कठोर कारवाई करावी, आरोपींना गावात येण्यास पायबंद घालून त्यांची घरे व दुकाने जमीनदोस्त करावीत या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 12.30 दरम्यान अडीच महामाार्ग रोखून धरला. पोलिस प्रशासनाने दुपारी मध्यस्थी केल्यानंतर जमाव हटल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र तासाभरानंतर पुन्हा जमाव आक्रमक झाल्याने व अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांनी फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील वाहतूक अडीच तास बंद ठेवत यावल रस्त्याने वाहतूक वळवली. दरम्यान, दुपारी पावणेचार वाजता पोलीस बंदोबस्तात मृत तरुण शुभम अशोक सपकाळे (24, अकलूद) या तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चाकूहल्ल्याच्या घटनेची पार्श्वभूमी अशी
भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथे 24 वर्षीय शुभम सपकाळै हा मित्र मुकेश तायडे (32) सोबत दुचाकीवरून जात असताना आरोपींनी शुभमवर जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला होता. ही घटना मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास टोल नाक्याजवळ घडली होती. या घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चाकू हल्ल्याप्रकरणी मुकेश तायडेच्या फिर्यादीवरून संतोष शामलाल गुप्ता, अविनाश शामलाल गुप्ता, चकर्‍या, भोला, शामलाल गुप्ता व सागर पिवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा घडल्यानंतर संतोषसह अविनाश व चकर्‍या (पूर्ण नाव माहित नाही) यांना अटक करण्यात आली होती व ते संशयित कारागृहातच आहेत.

पाच तास महामार्ग थांबला
भुसावळ-बर्‍हाणपूर हा आंतरराज्यीय महामार्ग असून अकलूद येथील आंदोलनामुळे सोमवारी दिवसभरात पाच तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांसह बसमधील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी 10 ते 12.30 दरम्यान रास्ता रोको झाल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांनी जमावाची समजूत काढत बळाचा वापर करून जमाव पांगवला मात्र त्याच्या काहीच वेळेत पुन्हा जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी फैजपूर रस्त्यावरील दोन्ही बाजूला रस्त्यात पोलिस वाहने आडवे लावून वाहतूक थांबवली तर भुसावळकडून येणारी वाहने यावल मार्गाने वळवण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.

या अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, शहरचे निरीक्षक गजानन पडघण, फैजपूरचे सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, निंभोर्‍याचे सहा.निरीक्षक गणेश धूमाळ, सावद्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक एन.जे.शेख, उपनिरीक्षक लोखंडे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, उपनिरीक्षक सुशील मोरे यांच्यासह आरसीपी प्लाटूनसह होमगार्ड कर्मचार्‍यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली.

आरोपींच्या घराची पुन्हा तोडफोड
पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देवूनही समाधान न झालेल्या संतप्त जमावाने संशयित अविनाश गुप्ता व संतोष गुप्ता यांच्या घराच्या दरवाजाची मोडतोड केली तर यापूर्वीदेखील संशयीताच्या टपरीवजा घराची मोडतोड केल्यानंतरही आजही त्याच घरातील लाकडी खांब तोडण्यात आले तर आरोपींनी अतिक्रमण करून बांधलेल्या तीन दुकानातील भाडेकरूंनीदेखील भीतीपोटी दुकाने खाली करीत पुढील बाजूचे अतिक्रमण स्वतःच हटवले. गावातील संतापजनक वातावरण पाहता गावात तसेच आरोपींच्या घरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
ट्रामा केअर सेंटरमध्ये मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास मयत शुभम सपकाळे या तरुणाच्या मृतदेहावर पोलिस बंदोबस्तात तापी नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.


कॉपी करू नका.