लाखाचा ऐवज असलेली बॅग भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केली परत


भुसावळ : डाऊन गोवा एक्स्प्रेसमध्ये बेवारस असलेल्या बॅगेबाबत लोहमार्ग पोलिसांना प्रवाशांनी माहिती कळवल्यानंतर त्यांनी भुसावळात गाडी आल्यानंतर पंचनामा करीत बॅग जप्त केली. बॅगेच्या तपासणीअंती त्यात लाखांचा ऐवज आढळला तर भुसावळातील लोहमार्ग पोलिसांकडे बॅग असल्याची माहिती कळताच रेल्वे प्रवाशांनी धाव घेतल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशाला बॅग परत केली.

लाखाचा ऐवज असलेली बॅग केली परत
झाले असे की, प्रियंका अनिल राठोड (31, गुलावडा, खोमाखेडी, खरगोन, मध्यप्रदेश) 4 रोजी 12773 डाऊन गोवा एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 6 च्या बर्थ क्रमांक 47 व 55 वरून गोवा ते खंडवा प्रवास करीत असताना त्यांची बॅग बेवारस असल्याचे समजून प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांना सूचित केले. हवालदार रामकृष्ण खंडागळे व पांडुरंग वसू, सिद्धार्थ देशमाने यांनी बॅग पंचनामा करून ताब्यात घेतली. रेल्वे प्रवासी राठोड यांना भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे असल्याचे कळताच त्यांनी धाव घेतली. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक अनिल केरूरकर व कर्मचार्‍यांनी बॅग परत केली. दरम्यान, या बॅगेमध्ये असलेल्या पर्समध्ये 950 रुपयांचा रोकड, 55 हजारांचा नेकलेस, 15 हजारांची कर्णफुले, 10 हजारांची लेडीज अंगठी व दोन हजारांचे चांदीचे बिछवे असा एकूण एक लाख दोन हजार 950 रुपयांचा ऐवज होता. लोहमार्ग पोलिसांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला बॅग परत केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


कॉपी करू नका.