पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माणुसकीची भिंत उभारणार-जगन सोनवणे

भुसावळ- पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारासह कोकण व राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड पाऊस व पुरामुळे हजारो कुटुंब उघड्यावर आल्यानंतरही सरकारकडून पुरेशी मदत मिळालेली नाही मात्र विविध संस्थांतर्फे मदत देण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी साई तारा ट्रस्ट व भारतीय ओडबसम एका मोहिमेतून भिंत माणुसकीची उभारून मदत गोळा करणार असल्याचे पीपल्स रीपाइंचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी सांगितले. ते वरणगाव रस्त्यावरील सुरभी लॉजमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत बोलत होते. यावेळी नगरसेविका पुष्पा सोनवणे, साई तारा ट्रस्टचे संदीप निकुंभ, देवेंद्र कोयंडे, संगीता ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.
मदत करणार्यांचा होणार सन्मान
जगन सोनवणे पुढे म्हणाले की, पूर परीस्थितीमुळे राज्यातील नाशिक, विदर्भ, मराठवाडा, गडचिरोली येथे सुद्धा बिकट परीस्थिती निर्माण झाली होती. पुराच्या तडाख्याचा फटका बसलेल्या गावातील संकटात सापडलेल्या लोकांना मदतीसाठी जुन्या नगरपरीषदेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माणुसकीची भिंत उभारून आजपासून येत्या 30 ऑगस्टपर्यंत उपक्रमातून कपडे, धान्य, पुस्तके, वह्या, साबण, टूथपेस्ट, स्वच्छतेचे तसेच संसारोपयोगी साहित्य, आर्थिक व अन्य मदत स्वीकारून ती गोळा केल्यावर 30 ऑगस्ट रोजी चित्रपट कलावंतांच्या उपस्थितीत रवाना करण्यात येईल व मदत करणार्यांचा त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येईल, असेही सोनवणे म्हणाले. दरम्यान, जगन सोनवणे यांनी या उपक्रमात पुढाकार घेत 50 हजारांच्या मदतीचा धनादेश साई तारा ट्रस्टचे संदीप निकुंभ यांच्याकडे सुपूर्द केला.




