शिरपूरात 53 लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त

कर्नाटकातील दोघे ट्रक चालक जाळयात : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई


Banned tobacco worth 53 lakh seized in Shirpur शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 53 लाख रुपये किंमतीची राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखू जप्त केल्याने गुटखा तस्कर हादरले आहेत. हाडाखेड तपासणी नाक्यावर तसेच दहिवद शिवारात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कर्नाटकातील दोघा ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून ट्रकसह एकूण 83 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालक किशोर राव एन.नरेंद्र राव (31, रेल्वे कम्पाउंड, मापाडी रोड, बंग्लोर कर्नाटक) व मंजू रोककडदम चनाप्पा (33, एन.ए.प्लॉट मैदान, धारावाड, कर्नाटक) या दोघांना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गुटखा तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवार, 10 रोजी रात्री एक वाजेनंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला. ट्रक (के.ए.01 ए.जे.2776 हाडाखेड तपासणी नाक्याजवळ आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात गुटख्याच्या साठा आढळला तर दहिवद गावाजवळ हॉटेल छत्रपतीसमोर मध्यप्रदेश राज्याकडून महाराष्ट्रात येणारा मालट्रक (के.ए.01 ए.जे.0015) अडवल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर त्यात सुगंधी तंबाखू आढळल्याने हा ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

83 लाखांचा मुद्देमाल जप्त
यंत्रणेने दहिवदजवळ पकडलेल्या ट्रकमधील 33 लाख 60 हजार रुपये किंमतीची राज्यात प्रतिबंधीत रत्नानी तंबाखू तसेच 15 लाखांचा ट्रक तसेच हाडाखेड तपासणीजवळ केलेल्या कारवाईत 12 लाखांची रत्नानी तंबाखू, सात लाख 64 हजार 400 रुपये किंमतीची रत्नानी तंबाखू व 15 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 83 लाख 24 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक अंन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, कृष्णा पाटील, संजय सूर्यवंशी, संदीप ठाकरे, रोहिदास पावरा, मनोज पाटील, संतोष पाटील, इसरार फारूकी, कृष्णा पावरा, मुकेश पावरा, योगेश मोरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !