पोल्ट्री शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना : धुळ्यात एलसीबीच्या कारवाईत चौकडी जाळ्यात
चौकडी जाळ्यात : धुळे गुन्हे शाखेची कारवाई : दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
Fake liquor factory started in poultry shed: Quartet in LCB’s operation in Dhule धुळे : धुळे स्थानिक शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील सुभाष नगर भागात पोल्ट्री शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापेमारी करीत चौकडीच्या मुसक्या बांधल्या. एक लाख 55 हजारांचा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला असून चौघा संशयितांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद रामचंद्र गाबडा (मिशन कम्पाउंड, साक्री रोड, मोगलाई, धुळे), ललित भिकन माळी (देविदास कॉलनी, जुने धुळे), दर्शन संजय चौधरी (सुपडू आप्पा कॉलनी, जुने धुळे), धीरज कैलास माळी (सुपडू आप्पा कॉलनी, जुने धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सुभाष नगर, जुने धुळे भागातील बर्फ कारखान्याजवळील पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये अवैधरीत्या दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी पथकाने छापेमारी करीत शेत मालक धीरज माळीसह चौकडीच्या मुसक्या बांधल्या. बनावट दारूच्या कारखान्यातून 70 हजार 560 रुपये किंमतीची प्रिन्स दारूचे 21 बॉक्स, 12 हजार 800 रुपये किंमतीच्या काचेच्या रीकाम्या बाटल्यांच्या 32 गोण्या, 12 हजार 250 रुपये किंमतीची देशी दारू, साडेतीन हजारांचे 35 लीटर स्पिरीट, पाच हजार 206 रुपयांचे देशी दारू बनवण्याचे साहित्य, 40 हजारांची दुचाकी (एम.एच.18 ए.व्ही.2112) व 10 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा एकूण एक लाख 54 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखा निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, तुषार पारधी, विनोद पाठक, योगेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.