वावडदा उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू


Death of Vavadda Upasarpanch due to heat stroke जळगाव : आग ओगणार्‍या सूर्याच्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील उष्माघातात बळी पडलेल्यांच्या संख्येत वाढ होतच आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (45) यांचा उष्माघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. शुक्रवारी दिवसभर उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केल्यानंतर घरी आल्यावर त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

मका काढताना उन्हाचा फटका
वावडदा परीसरात बिबट्याचा वावर आहे. परीसरात बिबट्याची भीती पसरली असल्याने शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने कमलाकर पाटील यांना स्वतः शेतात मका काढण्यासाठी जावे लागले. त्यांनी शुक्रवारी दिवसभर उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना शौच व उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांनी घरगुती उपचार केले मात्र तरीही सुधारणा न झाल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांचा मृत्यू झाला.

उपसरपंचांच्या निधनानंतर गावात व्यवहार बंद
कमलाकर पाटील हे वावडदा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमनही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, याच गावातील उखई विक्रम जाधव (35) या तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. सलग दुसर्‍या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने शनिवारी गावातील व्यवहार व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले.

 


कॉपी करू नका.