भुसावळात मंदिराच्या कळसाची चोरी : आरोपीला बाजारपेठ पोलिसांकडून अटक

Theft of temple culmination in Bhusawal : Accused arrested by market police भुसावळ : शहरातील पंधरा बंगला रोडवरील तापेश्वर महादेव मंदिरावरील पितळी कळस चोरट्यांनी लांबवल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आशिष शशिकांत तिवारी (रामायण नगर, भुसावळ) यांनी तक्रार दिल्यानंतर शनिवार, 20 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देवेंद्र उर्फ नानू जितेंद्र भांडारकर (अजंता रेल्वे कॉलनी, भुसावळ) यास अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून मंदिराचा चोरलेला कळस जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पंधरा बंगला रस्त्यावर भाविकांचे श्रद्धास्थान तापेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या कळसावर सात हजार रुपये किंमतीचा व पाच किलो वजनाचा पितळी कळस लावण्यात आला होता मात्र शनिवारी मध्यरात्री कळसाची चोरी झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अन्वर शेख, नाईक निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


