वरणगाव सेक्शनमध्ये गाड्यांची गती वाढणार ; ऑटोमेटीक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित
भुसावळ : भुसावळ विभागात जळगावनंतर आता वरणगाव सेक्शन ऑटोसेक्शन झाल्याने वरणगाव सेक्शनमध्ये गाड्यांची गती वाढण्याचा मार्ग मोकळा झाला असून भुसावळ-वरणगाव या 12 किलोमीटर अंतरात रेल्वे प्रशासनाने ऑटोमेटीक सिग्नल यंत्रणा मंगळवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत कार्यान्वित केली. यापूर्वी जळगावकडे जाणार्या रेल्वे गाडीने भादली स्थानक सोडल्यावर भुसावळ स्थानकावर कळवले जात होते व त्यानंतरच भुसावळातून जळगावकडे जाणारी दुसरी गाडी सोडली जात होती मात्र ऑटोमेटीक सिग्नल यंत्रणेमुळे तसे करण्याची गरज नसल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
वर्षभरानंतर सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण
गेल्या वर्षभरापासून सिग्नल अॅण्ड टेलिकॉम विभागातर्फे या यंत्रणेचे काम सुरू होते तर मंगळवारी काम पूर्ण झाल्याने ही यंत्रणा रेल्वेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला जोडण्यात आली. भुसावळ-जळगावनंतर भुसावळ विभागातील दुसरी ऑटोमॅटीक सिग्नल यंत्रणा ही भुसावळ-वरणगावदरम्यान सुरू झाली झाली या यंत्रणेवर 12 कोटी रुपयांचा खर्च झालयाचे सांगण्यात आले. दरम्यान, डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा, वरीष्ठ परीचालन प्रबंधक डॉ.स्वप्निल नीला, सिग्नल अॅण्ड टेलिकाम विभागाचे प्रबंधक आर.आर.पोद्दार, वरीष्ठ अभियंता इशांत द्विवेदी यांच्या उपस्थितीत अॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा मंगळवारी कार्यान्वित झाली.