वादळी पावसात केळी पीक उद्ध्वस्त ; यावल शहरात अनेक घरांवर वृक्ष कोसळले

Banana crop destroyed in stormy rains ; Trees fell on many houses in Yawal City यावल : शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी आणि रात्री वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. यात यावल शहर शिवारासह तालुक्यातील अट्रावल, विरावली परीसरात केळी पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाले तर शहरातील विविध भागात घरांवर वृक्ष कोसळून अनेक कुटुंबीयांचे नुकसान झाले. याबाबत महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले असून संबंधितांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
तहसीलदारांनी केल्या सूचना
बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह यावल तालुक्यात पाऊस झाला. सायंकाळी आणि रात्री मुसळधार पावसाने शहरासह तालुक्यातील अट्रावल, विरावली शेत शिवारातील कापणी योग्य केळी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली. प्रामुख्याने अट्रावल येथील रमेश काशीनाथ कोळी यांच्या शेत गट क्रमांक 928 मधील 70 टक्के केळी जमीनदोस्त झाली. त्याचप्रमाणे यावल शहरात विविध भागांमध्ये घरांवर व दुकानांवर वृक्ष कोसळून नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील व शेत शिवारातील शेतात पाहणी करून तातळीने पंचनामे करण्याच्या सुचना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी केल्या. शहरात मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी इश्वर कोळी यांनी पाहणी करून पंचनामे केले. विविध ठिकाणी घरांवर पडलेले वृक्ष हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
असे झाले नुकसान
बोरावलगेट भागात नितीन भगवान अडकमोल यांच्या वैभव किराणा दुकानावर वृक्ष कोसळून विक्री करीता आणलेले तेल, साखर, दाळी पाण्यात भिजल्या व त्यांचे मोठे नुकसान झाले. दुकानाची भिंत, पत्रे यांचे मोठे नुकसान झाले तसेच बोरावल गेट भागात सचिन पारधे, पावरा वस्तीत आसाराम मदन बारेला, मदिना नगरात शेख इब्राहिम शेख हाफीस, ताहेराबी हाफीज शेख व अनिस पिंजारी यांच्या घरावर वृक्ष कोसळून नुकसान झाले.
