पळासनेर अपघातातील मृतांची संख्या दहावर : जाणून घ्या मृतांची नावे एका क्लिकवर

पाच दुचाकींसह पाच वाहनांचे नुकसान : जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांची धाव


शिरपूर : शिरपूरजवळील पळासनेर बायपासवर कंटेनरचे बे्रक फेल झाल्यानंतर सुसाट कंटेनरने समोरून येणार्‍या पाच दुचाकीसह अन्य पाच चारचाकी वाहनांना उडवत बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडल्याने भीषण अपघातात दहा नागरीक जागीच ठार झाल्याची व 31 नागरीक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली होती. मृतांमध्ये दोन महिला, तीन विद्यार्थी, चिमुकल्यासह वयोवृद्धाचा समावेश आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शिरपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहतूक नियंत्रीत करीत जखमींना उपचारार्थ हलवले.

न्यूट्रल गिअर प्रवाशांच्या जीवावर
खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदौर येथून गिट्टी घेवून चौदा चाकी कंटेनर (एन.एल.01 ए.जी.6447) हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास नरडाणा येथील वंडर सिमेंट फॅक्टरीकडे सुसाट दिशेने निघाला होता. पळासनेर बायपासजवळील उतारावर डिझेल वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालक कन्हैयालाल देवसिंग बंजारा (42) व क्लीनर सूरपाल जवानसिंग राजपूत (38, दोन्ही रा.बिजव, जि.चितोडगढ) याने वाहन न्यूट्रल केले मात्र त्याचवेळी न्यूट्रल वाहनामुळे कंटेनरचे ब्रेक फेल झाले व कंटेनर हा समोरून येणार्‍या वाहनांना धडक देत सुटल्याने पाच दुचाकी तसेच चारचाकी (एम.एच.18 बी.आर.5075) सह स्कूल बस, पिकअप, कंटेनर अशा एकूण दहा जणांना धडक बसल्याने वाहनांचे नुकसान झाले तर अपघातग्रस्त कंटेनर त्यानंतर थांबला नाही. बसस्थानकावर (पिकअप पॉईंट) बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना चिरडून एका हॉटेलात तो शिरला व बाहेर येताच उलटल्याने कंटेनरमधील गिट्टी रस्त्यावर विखुरली. अपघातामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दहा जणांचा जागीच मृत्यू
मृतांमध्ये कंटेनर चालक कन्हैयालाल देवसिंग बंजारा (42) व क्लीनर सूरपाल जवानसिंग राजपूत (38, दोन्ही रा.बिजव, जि.चितोडगढ), प्रतापसिंग भीमसिंग गिरासे (70, पळासनेर, ता.शिरपूर), निर्मला तेरसिंग पावरा (15, कोळशापाणी, ता.शिरपूर), मुरी सुरूसिंग पावरा (28, कोळशापाणी, ता.शिरपूर), सुनीता राजेश खंडेलवाल (51, जीटीपी स्टॉप, धुळे), पंकज पिंट्या पावरा (7, कोळशापाणी, ता.शिरपूर), संजय जायमल पावरा (28, कोळशापाणी, ता.शिरपूर), रीतेश संजय पावरा (14, कोळशापाणी, ता.शिरपूर), दशरथ कमल पावरा (35, पळासनेर, ता.शिरपूर) या दहा जणांचा समावेश आहे. शिरपूर कॉटेज हॉस्पीटलमध्ये बेशुद्धावस्थेत उभयंतांना आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, धुळ्यातील सुनीता खंडेलवाल या पर्यटनासाठी कुटूंबियांसोबत गेल्या होत्या मात्र परतीच्या प्रवासात क्रुर काळाने त्यांच्यावर घालाा घातला. त्यांचे पती व मुले या अपघातात जखमी झाले आहेत.

तिघे गंभीर ; 28 जण जखमी
कंटेनरच्या जबर धडकेने झालेल्या अपघातात एकूण 31 नागरीक जखमी झाले असून त्यांच्यावरून सुरूवातीला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र दुपारनंतर सर्व जखमींना धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत तर अन्य 28 नागरीकांवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

अपघातस्थळी रक्ताचा सडा अन् किंकाळ्या
मंगळवारी सकाळी 10.30 वाजता विद्यार्थी बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करीत होते तर हॉटेलमध्ये ग्राहक चहाचा आस्वाद घेत होते मात्र त्याचवेळी नियंत्रण सुटलेला सुसाट कंटेनर एक-एक करीत पाच दुचाकींना उडवल्यानंतर रस्त्यावरून येणार्‍या प्रत्येक वाहनाला धडक देत बसस्टॉपवरही धडकला व नंतर तो एका ढाबेवजा हॉटेल शिरून नंतर रस्त्यावर उलटला. सुरूवातीला काय झाले हे कळतच नव्हते मात्र नागरीकांच्या किंकाळ्या व वाहनाच्या धडकेच्या आवाजानंतर लोकांनी घडला प्रकार पाहिल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. या अपघातात पाच दुचाकीसह अन्य पाच चारचाकी वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले. अपघातस्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचे चित्र पाहून अनेकांना धक्का बसला.

जिल्हाधिकारी व धुळे पोलीस अधीक्षकांची धाव
अपघाताचे वृत्त कळताच धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शिरपूर पोलीस अधीक्षक सचिन हिरे, शिरपूर निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह शिरपूरचे पाच उपनिरीक्षक, कर्मचारी तसेच तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे, एपीआय पावरा, थाळनेर एपीआय शिरसाठ, प्रांत प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी तसेच जिल्हाधिकारी जलद शर्मा आदींनी धाव घेत पाहणी केली. आमदार काशीराम पावरा यांनी भेट दिली.

अपघाताच्या कारणांचा शोध : उपाययोजना करणार
धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना म्हणाले की, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जाईल. ब्रेक फेल हे कारण अद्याप समोर आले असलेतरी उतारावर वाहनधारक वाहने न्यूट्रल करतात त्यामुळे अनेकदा ब्रेक लागत नाही. आजच्या अपघातात 10 नागरीक ठार झाले असून तीन गंभीर तर 28 नागरीक जखमी झाले आहे. कंटेनर चालक व वाहकही ठार झाले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात थांबवण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक, फलक लावण्याबाबत संबंधित विभागासोबत बैठक घेवून तत्काळ निर्णय घेण्यात येईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !