मुक्ताईनगरात आमदार एकनाथराव खडसे गरजले : खोक्याचे सरकार आता पाडा


In Muktainagar, MLA Eknathrao Khadse demanded: Bring down the box government nowमुक्ताईनगर : मला जनतेने आजपर्यंत प्रेम आणि आशीर्वाद दिल्याने मी आज 30 वर्षे आमदार निवडून येत आहे परंतु आज खोक्याचे राजकारण सुरू झाले आहे. प्रामाणिक जनता पैशांचा नाही तर कामाचा आग्रह धरणारी आहे. मुक्ताईनगरात आमदार म्हणून जे निवडून आले ते शरद पवार साहेबांच्या आदेशाने निवडून आले आहेत त्यांना आता परंतु चाळीसगावला पाठवायचे आहे त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते शरद पवारांचे हात मजबूत करा. हे खोक्यांचं सरकार पाडा, असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केले.

लबाड सरकारला उलथवून लावा ः रोहित पवार
शेतकरी सामान्य माणूस यांच्या मतावर निवडून आलेले तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या नावावर सत्तेवर आलेलं सरकार यांना सामान्यांच्या समस्यांची काहीही देणे घेणे नाही. केवळ स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे त्यामुळे शेतकरी व सामान्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असलेल्या अशा या लबाड सरकारला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उलथवून टाका, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी शनिवारी मुक्ताईनगरात केले. माजी मंत्री तथा एकनाथराव खडसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई यांचे दर्शन घेऊन कोथळी येथून दुपारी दीड वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.

आमदार खडसेंची लाडूतुला
मिरवणूक मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात आल्यानंतर तीन जेसीबीच्या सहाय्याने तेथील महापुरुषांच्या पुतळ्यांवर मान्यवरांच्या हस्ते शेकडो किलो पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आमदार एकनाथराव खडसे यांची लाडूतुला करण्यात आली. त्यानंतर भव्य रॅली दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह बोदवड रस्त्याने नंतर खडसे फार्म हाऊसवर नेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बॅनर्स वाहनांच्या ताफ्यावर झळकत होते व भव्य अशा जीपमध्ये आमदार रोहित पवार, अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर भव्य मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी आमदार एकनाथराव खडसे यांचा 51 हजार रुपयांच्या नोटांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भव्य अशा पुष्पहाराने नाथाभाऊंचा सत्कार करण्यात आला. सोबतच 72 किलोचा केकही कापण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी आमदार रोहित पवार, अ‍ॅड.रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रसन्नजीत पाटील-राजापूरकर, विकास लवांडे, कविता मिटकरी, पंकज मोहोळ, डॉ.बी.एस.पाटील, वंदना चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष रमण भोळे, मंदा खडसे, जळगाव महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन, गोल्डमॅन प्रशांत सपकाळे, विनोद तराळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राजू माळी, विलास धायडे, बापू ससाणे, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, ईश्वर रहाणे, बबलू सापधरे, दीपक साळुंखे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, संदीप देशमुख यांनी परीश्रम घेतले.

जवाबदारी पेलणार : अ‍ॅड.रोहिणी खडसे
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, लोकनेते पवार साहेबांनी जी महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती आपणा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहे. यावेळी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील तसेच शिंदे गटात गेलेले अजित पवार यांच्यावरही टीका करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.सुनील नेवे यांनी तसेच प्रा.डॉ.संजय साळवे यांनी केले.


कॉपी करू नका.