तर खास अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी समाजाला आरक्षण द्या : जळगावात उद्धव ठाकरे


जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या वर संसद हा अधिकार तुम्ही जसा घेतला तसा आता आगामी खास अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी समाजाला आरक्षण द्या, त्याबाबत ठोस निर्णय घ्या, याबाबतच्या निर्णयाला शिवसेना देशात पाठिंबा देणारा पहिला पक्ष असेल, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे मांडली. जळगावात महापुरूषांच्या पुतळा अनावरणानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.

तर हे पुन्हा गोध्रा घडवतील
आपल्या आक्रमक शैलीत ठाकरे यांनी राज्यातील सरकारसह केंद्र सरकारवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, आगामी काळात जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे मात्र राजकारणासाठी हे देशातील लाखो हिंदूना अयोध्येत बोलावतील मात्र परतीच्या प्रवासात हे दंगली घडवतील कारण त्यानंतर त्यांना राजकीय पोळ्या शेकता येतील, असा आरोपही ठाकरेंनी केला.

पोलिसांना हल्ला करण्यास सांगणारा कोण?
मुख्यमंत्र्यांना जी 20 परीषदेत जायला वेळ आहे मात्र जरांगे पाटलाला भेटायला वेळ नाही. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यानेच शांततेच्या मार्गाने चाललेल्या मराठा आंदोलकांवर गोळीबार, लाठीहल्ला करण्यात आला, असा दावा ठाकरेंनी केला. लाठीहल्ला करणारे पोलीसदेखील माणसे आहेत, त्यांच्यात राक्षस जन्माला येवू शकत नाही, पोलीसदेखील माणूस असून त्यांनी कोरोनात अनेकांचा जीव वाचवला आहे हे विसरून चालणार नाही. शांततेत चाललेल्या आंदोलनात पोलीस का घुसले ,
जालियनवाला कांड घडले तसे जालनावाला कांड घडले मात्र यास कोण जवाबदार आहे? असा प्रश्न जनतेतून त्यांनी विचारल्यानंतर टरबूज्या असा आवाज आल्यानंतर त्यांनी आपण या टरबूज्याला पाहिलेले नाही मात्र लवकरच पाहणार असल्याचे ते म्हणाले.

हे तर कामाचे पोलादी पुरूष
सरदार वल्लभभाई पटेल हे नुसते नावाचे पोलादी पुरुष नव्हते तर कामाचे पोलादी पुरुष होते. पण आज कोणीही उठतो आणि स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेतो पण काम करून उभं राहणारे काही तुरळक लोक आहेत. त्यापैकी पटेल एक आहेत. त्यांचा पुतळा पालिकेच्या आवारात उभारला हे महत्त्वाचं आहे. यावेळी त्यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून भाजपवर जोरदार टीका केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात फौजा घुसवल्या आणि मराठवाडा महाराष्ट्रात समील करून घेतला होता. आज आपण त्यांचे पुतळे उभारतोय. कारण ते खरे पोलादी पुरुष होते. वल्लभभाईंनी मराठवाड्यात जशी कारवाई केली. तशी मणिपूरममध्ये कारवाई करायची यांची हिंमत होत नाही. हे स्वत:ला पोलादी पुरुष म्हणून घेत आहेत. हे कसले पोलादी पुरूष ? हे तर तकलादू पुरूष आहेत. यांच्या कारभाराचा सोक्षमोक्ष लावायचा आहे असेही त्यांनी सांगितले.

खडसेंना संपवले, आता महाराष्ट्रातील नेते संपवत आहेत
फडणवीस यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले की, भाजपातील तुल्यबळ असलेल्या एकनाथ खडसेे यांचे राजकारण संपवण्यात आले आता महाराष्ट्रातील तुल्यबळ नेत्यांचे राजकारण संपवण्याचा घाट सुरू आहे. आयारामांची येथे भरती झाल्याचे ठाकरे म्हणाले.


कॉपी करू नका.