प्रधानमंत्री योजनेतून भुसावळात पाच हजार घरांना मंजुरी


आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश ; अतिक्रमितांसह लाभार्थींना मिळणार हक्काचा निवारा

भुसावळ : प्रधानमंत्री आवास योजनेतून भुसावळ शहरासाठी पाच हजार घरांना मंजुरी मिळाली असून आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टी हटवण्यात आल्यानंतर रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड रोष वाढला होता. यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आली होती मात्र रेल्वेच्या नियोजित जागेवर रेल्वे कोच फॅक्टरी उभारणार असल्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटवण्यात आल्याने शेकडो कुटुंबांना अन्य जागेवर स्थलांतर करावे लागले होते. हक्काच्या जागेसाठी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणही छेडण्यात आल्यानंतर प्रशासन व आमदार संजय सावकारे यांनी हा तिढा सोडवत बेघरांना घरकुल मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार लाभार्थींच्या याद्या तयार करून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते.

माजी मंत्र्यांसह आमदारांच्या प्रयत्नांना आले यश
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदास रक्षा खडसे तसेच आमदार संजय सावकारे विस्थापीत झालेल्या अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळवून देण्याचा शब्द दिला होता शिवाय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वे करण्यात आल्यानंतर रेल्वे जागेवरील अतिक्रमण धारक तसेच अन्य लाभार्थी मिळून शहरात एकूच पाच हजार घरांना महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यावल रस्त्यावरील राहुल नगरामागील नियोजित जागेवर आता लवकरच घरकुलांची उभारणी होणार आहे

दिलेला शब्द पाळला -आमदार संजय सावकारे
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योजनेच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. रेल्वे जागेवरील अतिक्रमण उठवल्यानंतर विस्थापीत झालेल्या अतिक्रमण धारकांना आता हक्काचे घरकूल उपलब्ध होणार असून शासनाच्या सर्वेनुसार अन्य लाभार्थींना या योजनेंतर्गत घरकुल मिळणार आहे. एकूण पाच हजार घरांना भुसावळात मंजुरी मिळाली असून राहुल नगर मागील जागांवर घरकुलांची उभारणी होईल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.


कॉपी करू नका.