गुढ आवाजाने नंदुरबार शहर हादरले
खिडक्यांची तावदाने फुटली : ‘तो’ आवाज सुपरसानिक बुमचा
नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर शहादा भागात शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार आवाज झाल्याने नागरीक घराबाहेर पडले तर प्रचंड झालेल्या आवाजामुळे नागरीक हादरले असून अनेक नागरीकांच्या घराच्या खिडक्यांची तावदानेही फुटली. दरम्यान, आवाज नेमका कशामुळे झाला ? याची चर्चा शहरात रंगली आहे.
‘तो’ आवाज सुपरसानिक बुमचा
एटीसी मुंबई व हिंदुस्थान एरोनॉटिकल नाशिक यांच्या माहितीनुसार, सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून पुणे नाशिक व नाशिक एचएएलच्या अंडरच्या फ्लाइंग परीसरात शुक्रवारी सरावासाठी होते. नंदुरबार हा भाग नाशिक एचएएलच्या फ्लाईंग एरीयात येतो तर सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान हे पोहोचल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले शिवाय हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास अशा प्रकारे प्रचंड मोठा आवाज होत असल्याचे सांगण्यात आले.





सोशल मिडीयावरून विमान पडल्याचा अफवाच
दिवसभर नंदुरबार जिल्ह्यात गुढ आवाजाबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या तर काहींनी सोशल मिडीयावर विमान पडल्याचे जुने फोटो शेअर केले मात्र या नुसत्याच अफवा असून असे काहीही घडले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
