ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात आंततराष्ट्रीय कनेक्शन : आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी
पुणे : राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न होताच त्यातील इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांसह अन्य नऊ आरोपींना अर्थात 11 संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहा आरोपींना 24 पर्यंत पोलिस कोठडीत तर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
मुख्य आरोपी ललित पाटील, सुभाष मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलु अन्सारी, अरविंदकुमार लोहरे, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांना अटक करण्यात आली असून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, ड्रग्जची साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकार्यांनी न्यायालयात केली.
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडीत ऊर्फ रोहित कुमार, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांच्या पोलिस कोठडीत 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिला. तर, सुभाष मंडल, रौफ शेख, अभिषेक बलकवडे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी, प्रज्ञा कांबळे या पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.