धरणगाव पोलिस निरीक्षकांची सतर्कता : डिझेल चोरी करणार्या टोळीतील सदस्य पाठलागाअंती धरणगाव पोलिसांच्या जाळ्यात
Dharangaon police inspector alert : Members of diesel theft gang caught in Dharangaon police’s net after being chased धरणगाव : धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले व सहकार्यांनी चोरट्यांचा पाठलाग करीत मध्यप्रदेशातील एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून अन्य सदस्य पसार झाले आहेत. टोळीतील सदस्याला अटक झाल्याने डिझेल चोरीचे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चोरटे पुढे तर पोलिस मागे असा वेगवान थरार चोपडा-धरणगाव रोडवर मध्यरात्री सुरू होता मात्र या शर्यतीत अखेर पोलिसांनी बाजी मारली. अंधाराचा फायदा घेत तीन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले
चालकाच्या गळ्यास चाकू लावत लांबवले डिझेल
शिवेंद्रसिंग आदिराम धाकर (29, वाहन चालक, रा.रानीपुरा, ता.जौरा, जि. मुरेना (मध्य प्रदेश) हे त्यांची बल्कर गाडी क्र. (एन.एल. 01 एफ.9830) ही धरणगाव-चोपडा रोडवरील आयटीआयजवळ रोडाच्या खाली गाडी उभी असताना चालक झोपे असताना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना गाडी जवळ आवाज आल्याने त्यांनी खाली उतरुन बघायला जाताच संशितय गुरु उर्फ प्रशांत नवनाथ देवकाते याने धाकर याच्या गळ्यास धारदार चाकू लावत गळा कापण्याची धमकी दिली. याचवेळी योगेश धनगर, शुभम अविनाश शेळके आणि गोपाळ पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.रामनगर, धुळे) यांनी बल्कर गाडीच्या डिझेल टाकीचे झाकन तोडून सुमारे 120 लिटर डिझेल जबरीने काढून घेतले.





पोलिसांना पाहताच चोरांनी काढला पळ !
पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले हे आपल्या सहकारी नितीन चौधरीसह रात्रीच्या गस्तीवर होते. पोलिस निरीक्षक ढमाले यांना कार ओळखीची वाटल्यामुळे त्यांनी चालक चौधरी यांना पोलिस वाहन कारच्या समोर लावायच्या सूचना केल्या. पोलिस वाहन आपल्या दिशेने येत असल्याचे बघताच चोरटे घाईघाईने कारमध्ये बसून चोपड्याच्या दिशेने सूसाट निघाले. पोलिस निरीक्षक ढमाले यांनी देखील चालक चौधरी यांच्यासह कारचा पाठलाग करायला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक ढमाले यांनी तेवढ्यात रोटवदचे पोलिस पाटील नरेंद्र शिंदे यांना फोन करून घटनेची माहिती देत पोलिस वाहनाच्या मागे येण्याच्या सूचना केल्यात.
मध्यरात्री पाठलागाचा सिनेस्टाईल थरार
मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास चोर-पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार सुरू झाला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मार्ग बदलत दिशाभूल करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु पोलीस मागे हटलेच नाही. नांदेड फाटा आल्यावर चोरट्यांना कळून चुकले की, आपण कारने कितीही पळ काढला तरी पोलीस आपला पिच्छा सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी कार तिथंच सोडून शेतातून पळ काढायला सुरुवात केली. पोलिस निरीक्षक ढमाले यांना कळून चुकले होते की, ही सराईत गुन्हेगारांची टोळी आहे. त्यांच्याकडे हत्यार आहेत. त्यामुळे त्यांनी वाहनातून उतरताच सापळे पिस्तुल काढत आपले सहकारी नरेंद्र चौधरी यांच्यासह पाठलाग सुरू केला.
नरेंद्र चौधरींनी मोठ्या हिंमतीने पकडले चोराला !
निरीक्षक ढमाले यांना आणि पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरी हे वेगवेगळ्या दिशेने चोरांचा पाठलाग करत होते. थोडावेळ पाठलाग केल्यानंतर गुरु उर्फ प्रशांत हा त्यांच्या टप्प्यात आला. पोलिस आपल्या जवळ आल्याचे लक्षात येताच गुरुने चाकू काढून चौधरी यांना मारण्याची धमकी दिली. परंतू पोलीस कर्मचारी चौधरी यांनी न भिता मोठ्या हिंमतीने चोरासोबत दोन हात करत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न असफल तर झालाच. परंतू डीझेल चोरणारी एक मोठी टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे.
अधिकारी, कर्मचार्याच्या धाडसाचे होतेय कौतुक !
पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले आणि पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरी यांच्या धाडसाचे धरणगावकर कौतुक करत आहेत. निरीक्षक ढमाले यांनी देखील पोलिस कर्मचारी नरेंद्र चौधरीचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणी चालक शिवेंद्रसिंग धाकर ह्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहेत. दरम्यान, अटकेतील चोरट्याने धरणगावसह पारोळा, चोपडा, अमळनेरसह इतर ठिकाणी देखील चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी कार जप्त करून ठाण्यात आणली आहे.
