धुळ्यात जिंदाल स्टीलच्या नावाने बनावट पीओपी पट्ट्यांची विक्री : 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : एक आरोपीला अटक


Sale of fake POP belts in the name of Jindal Steel in Dhule: 24 lakhs seized  धुळे : स्टील क्षेत्रातील नामांकीत जिंदाल कंपनीचे नाव वापरून हलक्या पीओपीसाठी लागणार्‍या स्टील पट्ट्यांना प्रिंटरद्वारे जिंदाल कंपनीचे नाव देवून विक्री सुरू असताना धुळे गुन्हे शाखेने छापेमारी करीत 24 लाखांचा बनावट जिंदाल स्टीलचा साठा जप्त केला. याप्रकरणी मुख्तार खान शहजाद खान (प्लॉट क्रमांक 85, गरीब नवाज नगर, सार्वजनिक हॉस्पीटलजवळ, धुळे) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. या कारवाईने शहरात बनावट स्टील उत्पादनांची विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील शंभर फुटी रोडवरील स्मार्ट स्टील या दुकानात संशयित मुख्तार खान हा जिंदाल कंपनीच्या नावाने पीओपी बनवताना सिलिंगला लागणार्‍या बनावट स्टील पट्ट्यांची विक्री करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात रविवार, 3 रोजी सकाळी पथकाने गोपनीय पद्धत्तीने धाड टाकल्याने खळबळ उडाली.

महागड्या प्रिंटरद्वारे सुरू होता उद्योग
पथकाने धाड टाकल्यानंतर संशयित मुख्तार खान हा निलकमल कंपनीच्या महागड्या प्रिंटरद्वारे पीओपीला वापरल्या जाणार्‍या स्टील पट्टीवर जिंदाल कंपनीचे नाव प्रिंट करीत असल्याचे उघड झाले. पथकाने संबंधिताला याबाबतचा परवाना विचारला असता संबंधिताने हात वर केल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. साडेचार हजारांचा पत्र्याचा गठ्ठा, चार लाख रुपये किंमतीचे पत्र्याला आकार देणारे मशीन, दिड लाख रुपये किंमतीचे निलकमल कंपनीचे प्रिंटर, 18 लासख 76 हजार रुपये किेंमतीचे एकूण 186 पत्र्याचे गठ्ठे, दोन हजार रुपये किंमतीच्या सिलिंग पट्टी असा एकूण 24 लाख 32 हजार 4500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, चाळीसगाव रोडचे निरीक्षक धीरज महाजन, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, हवालदार मच्छिंद्र पाटील, हवालदार संदीप सरग, कॉन्स्टेबल शोएब बेग, चालक राजू गीते आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.