खिर्डीसह परीसरातील अवैध धंदे बंदसाठी पोलिस ठाण्यावर पदाधिकारी धडकले
वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक पोलिसांचा धाक संपल्याचा आरोप
खिर्डी : खिर्डीसह परीसरात खुलेआमपणे अवैध धंदे सुरू असून कारवाई करण्यास पोलिस यंत्रणा धजावत नसल्याने अवैध धंदे चालकांची मुजोरी वाढली आहे. पोलिसांनी अवैध धंदे चालकांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे व रावेर तालुकाध्यक्ष सायरा संजय कोचुरे यांच्या नेतत्वात निंभोरा पोलिस ठाण्यावर पदाधिकारी धडकले. यावेळी मागण्यांचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.
अवैध धंद्यांमुळे संसाराची राखरांगोळी
निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते बंद करण्यात यावेत, परीसरात खुलेआमपणे सट्टा-पत्ता आणि इतर अवैध धंद्यामुळे बोकाळल्याने गोरगरीब या धंद्यांच्या आहारी जात असल्याने त्यांच्या संसाराची राखरांगोळी होण्याची वेळ आली आहे. मजूर वर्ग दिवसभरात कमावलेले दोनशे ते पाचशे रुपये मजुरी देशी दारूसह, हातभट्टी व सटटा व पत्ता यामध्ये खर्च करीत असल्याने महिलावर्गाला घर चालवणे अशक्य ठरत आहे. अनेकांच्या घरातील तर चुलही पेटत नाही, अशी स्थिती आहे.





ढाब्यांवर मिळते सर्रास दारू
ऐनपूर, खिर्डीत सट्टापेटी तसेच निंबोल, खिर्डी, निंभोरा, तांदलवाडी, विवरा येथे पत्त्याचे क्लब सुरू आहे तर मांगलवाडीपासून तर सांगवेपर्यंत ढाब्यांवर देशी-विदेशी दारूला ऊत आला आहे. खिर्डीत मंदिर तसेच बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गावठी व देशी दारूची सर्रास विक्री केली जाते. शाळांच्या 50 मीटरच्या आत गुटखा विक्री केला जातो. पोलिस प्रशासनाने सर्व अवैध धंद्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. तसेच अवैध धंदे बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणार्या परीणामास निंभोरा पोलिस प्रशासन जवाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना यांची उपस्थिती
जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, तालुकाध्यक्ष सायरा कोचूरे, तालुक्यातील पदाधिकारी ललिता रमेश कोचुरे, आशा योगेश जाधव, पल्लवी कोळी, शोभा बिर्हाडे, उषाबाई रघुनाथ वाघ, गुफाबाई वाघ, कविता कोचुरे, कमल कोचुरे, सुमन कोचुरे, रेणुकाबाई भील, रेशमा तायडे, प्रमिला कोचुरे, सुरेखा आदिवाल, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, शे.याकूब शे.नासीर, बाळू शिरतुरे, सलीम शाह, कांतीलाल गाढे, ज्ञानेश्वर तायडे, संजय कोचुरे, पंकज तायडे, मनोहर तायडे, कुंदनसिंग बारेला यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
