शिस्तीच्या खात्यात गैरहजेरी भोवली : धुळे पोलिस दलातील सात कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पोलिस अधीक्षकांच्या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ
Absenteeism in Disciplinary Department: Seven personnel of Dhule Police Force hastily suspended धुळे : शिस्तीचे खाते म्हणून पोलिस दलाकडे आदराने पाहिले जाते मात्र या शिस्तीच्या खात्यातील पोलिसांनी शिस्त मोडत बंदोबस्त सोडून परस्पर दांडी मारल्याने सात पोलिस कर्मचार्यांना धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दुजोरा दिला.
बंदोबस्तात गैरहजेरी भोवली
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचार्यांना नाकाबंदी तसेच बिनतारी संदेशावर नियुक्ती दिली होती मात्र सात पोलिस कर्मचार्यांनी कर्तव्यात कसूर करीत दांडी मारल्याचा प्रकार समोर आला. दंगा काबू पथकातील (आरसीपी) कर्मचारी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर आढळले तर वरीष्ठांनी बिनतारी संदेश दिल्यानंतर काही कर्मचारी गैरहजर आढळल्याने अशांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने सेवेतून निलंबित केले.





या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई
निलंबित कर्मचार्यांमध्ये धुळे नियंत्रण कक्षातील हवालदार महेंद्र दौलतसिंग ठाकूर, मोटार परीवहन विभागातील चालक अमोल रमेश भामरे तर साक्री आरसीपी पथकातील शिपाई प्रदीप भटूसिंग ठाकरे, राकेश प्रकाश बोरसे, मुक्ता ईच्छाराम वळवी, विनोद पंडित गांगुर्डे, किशोर श्रीराम पारधी यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी कारवाई
पोलिस दलाकडे शिस्तीचे खाते म्हणून पाहिले जाते मात्र कर्तव्याबाबत गैरहजेरी खपवून घेणार नाही. आगामी काळात निवडणुका तसेच अन्य ठिकाणी लावलेल्या बंदोबस्तातही कर्मचार्यांची हजेरी तपासण्यात येईल तसेच सरप्राईज व्हिजीट करूनही कर्मचार्यांची हजेरी तपासली जाईल. त्यात हयगय करणार्या पोलिस कर्मचार्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.
